
नव्याने बांधण्याचे आश्वासन देताच वादावर पडदा
दोडामार्ग : तेरवण - मेढे येथील श्री स्वयंभू नागनाथ देवस्थानाच्या प्रवेशद्वारावरील कमान तिलारी ते वीजघर रस्त्याच्या कामावरील ठेकेदाराच्या डंपरच्या धडकेत जमीनदोस्त झाली. या घटनेमुळे ग्रामस्थ व भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. संबंधित ठेकेदाराला ग्रामस्थांनी जाब विचारल्यानंतर नुकसानग्रस्त कमान नव्याने बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतरच वादावर पडदा पडला.
तिलारी ते वीजघर मार्गावरील काँक्रिटीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारा डंपर सोमवारी सायंकाळी रिव्हर्स घेत असताना चालकाचा अंदाज चुकला. यावेळी डंपरची जोरदार धडक देवस्थानाच्या कमानीला बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की कमानीचा मोठा भाग कोसळून ती पूर्णपणे उध्वस्त झाली. श्री स्वयंभू नागनाथ देवस्थान हे तेरवण-मेढे परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. त्यामुळे देवस्थानाच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
धार्मिक भावना दुखावल्याची भावना व्यक्त करत ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, ठेकेदाराने ग्रामस्थांची समजूत काढत नुकसानग्रस्त कमान पूर्ववत व अधिक भक्कम स्वरूपात उभारून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी संयमाची भूमिका घेत प्रकरण शांत केले.
मात्र, या घटनेनंतर तिलारी ते वीजघर रस्त्याच्या कामाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सध्या पावसाळा सुरू असतानाही रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित करत हे काम तात्काळ बंद करावे, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.










