LIVE UPDATES

गजबादेवी मंदिराबाबत तिन्ही गावांचा महत्त्वपूर्ण निर्णय

गावघराच्या संमतीशिवाय स्थापन ट्रस्टला विरोध
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 22, 2026 20:08 PM
views 35  views

बहुमताने ठराव मंजूर

देवगड :  मिठबाव, कातवण आणि तांबळडेग या तिन्ही गावांचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देव रवळनाथ तसेच ग्रामदेवता श्री गजबादेवी यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी रविवारी (दि. २१) श्री देव रामेश्वर मंदिर येथे गावमेळा आयोजित करण्यात आला होता. या सभेला तिन्ही गावांतील ग्रामस्थ, बारा पाच मानकरी, देवसेवक व गावघरातील ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

श्री हेमंत प्रभाकर जोगल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत श्री गजबादेवी मंदिराच्या व्यवस्थापन, जीर्णोद्धार आणि ट्रस्ट स्थापनेबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी गावघराची संमती व गावमेळा न घेता स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टला बहुमताने विरोध दर्शविण्यात आला. तसेच मंदिराचा जीर्णोद्धार हा गावघराला विश्वासात घेऊन सर्वांच्या आर्थिक सहभागातून व्हावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.

याशिवाय ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, श्री देव रवळनाथ, ग्रामदेवता श्री गजबादेवी व सहदेवतांचा समावेश असलेला सर्वसमावेशक ट्रस्ट स्थापन करण्याची मागणीही सभेत करण्यात आली. श्री सागर प्रकाश जाईल व श्री दिनेश लोके गावकर यांनी ठरावांचे सूचन केले असून उपस्थित सभागृहाने त्यास बहुमताने मंजुरी दिली.

यावेळी अमोल विजय लोके, प्रसाद नाडकर्णी, सागर जाईल आणि दीपक बलवंत राणे यांनी मनोगत व्यक्त केले. सभेच्या शेवटी मधुसूदन लोके यांनी उपस्थितांचे आभार मानले.