
कुडाळ : झारापमध्ये सरपंच दक्षता मेस्त्री यांच्या विरोधातील अविश्वास ठरावामुळे गावातील वातावरण चांगलेच तापले आहे. रणरणत्या उन्हात सरपंच मेस्त्री स्वतः जनतेत उतरून प्रचार करताना दिसत आहेत. स्वच्छ व हरित ग्रामपंचायतीत राज्यात अव्वल स्थान मिळवणे ही त्यांची मोठी जमेची बाजू ठरत आहे.
अविश्वास ठरावासाठी स्वातंत्र्य मतपत्रिका असल्याने ती मतदारांना समजावून सांगण्यात वेळ जात आहे. दरम्यान, झाराप येथील केंद्रशाळेत सोमवार, ता. 27 रोजी सकाळी 10 वाजता विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली असून यावेळी अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून शाळेच्या मैदानात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाविरोधातील हा अविश्वास मान्य करायचा की अमान्य, याचा अंतिम निर्णय आता झारापच्या जनतेकडे आहे. मात्र ही निवडणूक मूठभर स्वार्थी लोकांनी गावावर लादल्याची चर्चा जोर धरत आहे.










