भाषण झाल्यानंतरची 'ती' चिठ्ठी

मुख्यमंत्र्यांनी राणेंबद्दलची सांगितली 'ती' आठवण
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 10, 2026 22:01 PM
views 68  views

कणकवली : अनेक वर्षे विधानसभेत नारायण राणे यांच्या सोबत काम करता आले याचे सौभाग्य मला मिळाले. त्यावेळी युतीचे नेते आमचे नारायण राणे, गोपीनाथ मुंडे होते. सभागृहात त्यावेळी पहिल्यांदा भाषण केले. 7 मिनाटांची वेळ होती. भाषण झाल्यानंतर एक चिठ्ठी आली, छान बोललास असा उल्लेख होता. आणि खाली नारायण राणे यांची सही होती. नारायण राणे यांच्या सोबत काम करणे ही माझ्यासाठी पर्वणीच होती. त्यांची आणि माझी आवड होती ती अर्थ संकल्पावर होती.  नारायण राणे बोलत असताना एक अर्थ तज्ज्ञ बोलतो असे वाटायचे. ते बोलताना सभागृह शांत असायचे, त्यांना काय उत्तर द्यायचे हे मंत्र्यांना समजत नव्हते. उत्तर दिलं तरी अडचण आणि नाही दिलं तरी अडचण अशी परिस्थिती असायची अशा नारायण राणेंबद्दलच्या आठवणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागवल्या. 

पुढे बोलताना ते म्हणाले,  एखादा कागद मंत्र्यांकडे पोचायच्या आधी नारायण राणे यांच्याकडे पोहोचायचं. त्यांच्याकडे वेगळी सीआयडी होती. अर्थसंकल्पावर बोलायचे मार्गदर्शन हे त्यांच्याकडून शिकलो. माझ्या अर्थसंकल्पावरील पुस्तकांचे प्रकाशन नारायण राणे यांच्या हस्ते व्हावे असे वाटत होते. उत्कृष्ट संसदपटू पहिल्याच टर्मला नारायण राणे यांच्यामुळे मिळाला. एखाद्या मंत्र्याने फाईलवर सही केली की त्याची एक नोट राणे साहेबांकडे असायची. मंत्र्यांना पाळताभुई व्हायची. त्यांचा एवढा दरारा होता, की आम्हाला थांबवायची हिंमत कोणात नव्हती. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यानां सभागृहात अनेकांनी त्रास दिला. मात्र राणे साहेब शिवसेना सोडून गेले, त्यावेळी त्यांना त्रास द्यायची कोणाचीही हिंमत होत नव्हती. पण ते शिवसेना सोडून गेले याची कारणे सर्वांना माहिती होती. एखाद्या विषयावर सभागृहात बोलायचे झाले तर अनेक आमदार गायब असायचे. राणे साहेबांसारखा दिलदार नेता होणे नाही. महाराष्ट्रात राणे यांची मजबूत पकड होती. कुठलंही काम गुणवत्तेवर करायचे, त्यात कोणतीही तडजोड करत नव्हते. ते कधीही पोटात ठेवत नाही, जे बोलायचे ते तोंडावर बोलतात. निलेश आणि नितेश सारखाच मला देवेंद्र म्हणून हाक मारायचा त्याना अधिकार आहे. माझ्या वाटचालीत त्यांच्या पत्नी खंबीरपणे उभ्या राहिल्या. निलेश, नितेश हे नारायण राणे यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत. या दोन्ही तरूण नेत्यांचा भविष्यकाळ उज्वल आहे. नारायण राणे कुठेही असले तरी हिंदुत्व आणि मराठीचे आणि कोकणावरील प्रेम काय राहिले. नारायण राणे हे देशाचे नेते आहेत, पण त्यांच्या हृदयात कोकण आहे. नेहमीच कोकणच्या विकासाची तळमळ त्यांच्यात आहे. अजून त्यांच्या मार्गदर्शनाची महाराष्ट्राला गरज आहे. त्यामुळे याच मैदानावर तुमची शंभरी करायला येऊ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.