कुडाळमध्ये ‘इतिहास कट्टा’चा दिमाखदार शुभारंभ

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 05, 2026 19:17 PM
views 50  views

कुडाळ : इतिहासाची गौरवशाली परंपरा आणि शिवचरित्राचा वारसा सर्वसामान्यांपर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी कुडाळमध्ये ‘इतिहास कट्टा’ या अभिनव उपक्रमाची मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. शिवप्रेमी संघटना आणि इतिहास संकलन समिती (कोकण प्रांत) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ३ एप्रिल २०२६ रोजी या उपक्रमाचा श्रीगणेशा झाला.

इतिहासाच्या पाऊलखुणा झाल्या जिवंत

लहानपणी गोष्टींतून ऐकलेला इतिहास अधिक जिवंत आणि सखोलपणे समजून घेता यावा, या संकल्पनेतून ‘इतिहास कट्टा’ साकारण्यात आला आहे. पहिल्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या देदिप्यमान चरित्राचे सादरीकरण करण्यात आले.

रविराज पराडकर यांच्या व्याख्यानाने श्रोते भारावले

प्रखर इतिहास अभ्यासक आणि वक्ते रविराज पराडकर यांनी आपल्या ओजस्वी वाणीने छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडले. सुमारे सव्वातास चाललेल्या या व्याख्यानाने उपस्थित कुडाळवासीयांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या शेवटी पराडकर यांनी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’च्या गायनाने संपूर्ण वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून गेले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुरातत्त्वविद् डॉ. अरविंद जामखेडकर होते. त्यांनी इतिहासाच्या अभ्यासाची निकड अधोरेखित करत या उपक्रमाचे कौतुक केले. प्रमुख उपस्थिती असलेले रा. स्व. संघाचे कोकण प्रांत संघचालक बाबा चांदेकर यांनी इतिहास आणि वर्तमान यांची सांगड घालून एकात्म भारताच्या निर्मितीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विषद केले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी कसाल येथील ओंकार कदम यांनी मांडलेले इतिहासकालीन आणि विविध देशांतील नाणी तसेच चलनी नोटांचे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या माहितीचाही समावेश होता, ज्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारत माता आणि शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने झाली. इतिहास संकलन समितीचे प्रांत सचिव चंद्रकांत जोशी यांनी संकल्प मंत्राचे सामूहिक उच्चारण केले.

सूत्रसंचालन: लऊ म्हाडेश्वर, आभार प्रदर्शन: डॉ. बापू भोगटे (जिल्हाध्यक्ष, इतिहास संकलन समिती), सहकार्य: कमलेश चव्हाण, रमा नाईक, सुभाष वाटवे आणि सहकारी. या उपक्रमाला कुडाळवासीयांचा उदंड प्रतिसाद लाभला असून, आगामी ‘इतिहास कट्टा’च्या भागांबाबत इतिहासप्रेमींमध्ये आतापासूनच मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.