एसटी कामगारांच्या १८ मागण्यांसाठी कुडाळमध्ये 'एल्गार'

राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 14, 2026 18:41 PM
views 43  views

कुडाळ : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी कुडाळ येथील नवीन एसटी डेपोच्या मैदानावर पार पडले. या अधिवेशनात राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो एसटी कामगारांनी आपली एकजूट दाखवून दिली. प्रलंबित असलेल्या विविध १८ मागण्यांबाबत यावेळी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, अनिल परब, महेश सावंत, माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, सरचिटणीस हिरेन रेडकर, विभागीय अध्यक्ष अनुप नाईक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सुभाष देसाई: "एसटी कामगारांनी संघटनेचा भगवा झेंडा नेहमीच उंच ठेवला आहे आणि हाच झेंडा त्यांना न्याय मिळवून देईल. कामगारांच्या मागण्यांसाठी प्रसंगी आंदोलनाची गरज भासल्यास संपूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.

खासदार अरविंद सावंत: "एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. ही सेवा नफा-तोटा पाहून नव्हे, तर 'सेवा' म्हणून चालवली गेली पाहिजे. कामगारांना न्याय मिळणे हा त्यांचा हक्क आहे. आमदार भास्कर जाधव: त्यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, "शासन कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. कामगारांचे थकीत पैसे तात्काळ मिळणे आणि सेवा सक्षम होणे काळाची गरज आहे."

आमदार अनिल परब: "एसटीचे खासगीकरण करण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. ही सेवा आणि कामगारांचे हक्क टिकवण्यासाठी आमचा लढा निरंतर सुरू राहील. या अधिवेशनादरम्यान उपस्थित मान्यवरांसह नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा संघटनेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी केले. यावेळी आमदार महेश सावंत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनीही कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचे व त्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. या अधिवेशनात एसटी कामगारांच्या वेतनवाढ, कामाचे तास आणि इतर प्रलंबित भत्त्यांसह एकूण १८ मागण्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.