
कुडाळ : कुडाळ शहरवासीयांना भेडसावणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना म्हणून कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. शहरात मोकाट कुत्रे पकडणे, त्यांचे निर्बिजीकरण करणे आणि लसीकरण करणे या विशेष मोहिमेचा आज भैरववाडी येथून शुभारंभ करण्यात आला.
प्रतापराव राणे एज्युकेशन ट्रस्टचे सहकार्य
ही मोहीम प्रतापराव राणे एज्युकेशन ट्रस्ट, मुंबई या संस्थेच्या तांत्रिक सहकार्याने राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व प्रभागांतील मोकाट कुत्र्यांना टप्प्याटप्प्याने पकडले जाईल. त्यानंतर त्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना रेबीज प्रतिबंधक लस टोचली जाणार आहे, अशी माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली. मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. गटनेते: विलास कुडाळकर, नगरसेवक: अॅड. राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, चांदणी कांबळी, नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर, अरविंद करलकर, रोहित भोगटे.संस्थेचे प्रतिनिधी: व्यवस्थापक प्रवीण कदम आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून शहरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. नगरपंचायतीच्या या धडक मोहिमेमुळे कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण येईल आणि सार्वजनिक आरोग्य व सुरक्षितता राखण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.










