मच्छी मार्केटच्या समस्या सोडवणार कधी ?

नगरसेवक सुर्याजींनी मुख्याधिकाऱ्यांना सुनावल !
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 09, 2026 14:52 PM
views 63  views

सावंतवाडी : येथील मच्छी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून अस्वच्छता आणि पाणीटंचाईमुळे विक्रेत्यांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून लक्ष वेधून २ आठवडे होऊन देखील कार्यवाही न झाल्याने नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना धारेवर धरले. सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणार कधी असा सवाल त्यांनी मुख्याधिकारी यांना केला. येत्या मंगळवारी बांधकाम व आरोग्य विभाग अधिकारी यांच्यासोबत तातडीची बैठक घेऊन यावर उपाययोजना करण्यात येईल असं आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी दिल‌. यावेळी गटनेते खेमराज उर्फ बाबू कुडतरकर उपस्थित होते. 

येथील मच्छी मार्केटमध्ये न.प. कर्मचारी घसरून पडल्याने दुखापतीने गंभीर झालेत. याप्रश्नी नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधल होत. मात्र, दोन आठवडे होऊनही कार्यवाही होत नसल्याचे गटनेते खेमराज उर्फ बाबू कुडतरकर व नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेत त्यांना जाब विचारला.  ‌यावेळी श्री. सुर्याजी म्हणाले, मच्छी मार्केट हे शहराच्या मध्यवर्ती आणि रहदारीच्या ठिकाणी आहे. बाजूलाच शाळा आणि रहिवासी वस्ती असल्याने येथील दुर्गंधीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. मार्केटमधील अंतर्गत भागात असलेले बंदिस्त फ्रीज हटवून ती जागा मोकळी करावी तसेच विक्रेत्यांनी केवळ ठरवून दिलेल्या ओट्यांवरच बसावे, खाली बसण्यास बंदी घालावी. मार्केटमधील तुटलेल्या फरश्या, गटारे आणि खिडक्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करून नवीन बांधकाम करावे. फरशीवर सतत पाणी असल्याने सफाई कर्मचारी व नागरिक घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. हे टाळण्यासाठी तिथे 'मॅटिंग' घालून पाण्याचे योग्य नियोजन करावे. सध्याचा पाणीपुरवठा अपुरा पडत असल्याने मार्केटसाठी त्वरित स्वतंत्र विहीर उपलब्ध करून द्यावी.होलसेल विक्रेत्यांनी मुख्य रस्त्यावर पाणी सोडू नये. त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा निश्चित करून सांडपाणी थेट गटारात जाईल, अशी व्यवस्था करावी. मच्छी मार्केटचा फलक नवीन लावून तिथे रोषणाई करावी. तसेच दर्पण रेसिडेन्सीकडे जाणाऱ्या मार्गावर पथदिवे बसविण्यात यावेत. मार्केट परिसरातील सर्व अनधिकृत बांधकामे तातडीने हटवण्यात यावीत व नप अधिकारी वर्गाला मच्छी विक्रेते जुमानत नाहीत त्यामुळे शिस्त हा प्रकार दिसत नाही अशा सुचना श्री सुर्याजी यांनी केल्या. यावर उद्या मंगळवारी तातडीची बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील अस आश्वासन मुख्याधिकारी श्री. औंधकर यांनी दिले.