पाल गावची सुकन्या काजल शिरसाट झाली दंतचिकित्सक

BDS पदवी मिळवत गावाचा मान वाढवला
Edited by: संदीप देसाई
Published on: March 09, 2026 13:17 PM
views 126  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील पाल गावची सुकन्या कु. काजल शरद शिरसाट हिने सोलापूर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय डेंटल कॉलेजमधून ४+१ वर्षांचा BDS (Bachelor of Dental Surgery) अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करून दंतचिकित्सक पदवी मिळवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात मान्यवरांच्या हस्ते तिला ही पदवी प्रदान करण्यात आली. कु. काजल ही माजी सैनिक तसेच दोडामार्ग तालुक्यातील कसई येथील मंडळ अधिकारी शरद कृष्णा शिरसाट यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल पाल गावासह दोडामार्ग तालुक्यात सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.

काजलचे प्राथमिक शिक्षण देवगड तालुक्यातील जामसंडे येथील आदर्श शाळा जोशी विद्यामंदिर येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण कणकवली येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला येथे पूर्ण झाले. तिलारी प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात गेलेल्या मूळ गावातील शिरसाट कुटुंबातील काजलने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. आपल्या यशामागे आई सीमा शिरसाट आणि वडील शरद शिरसाट यांचे मोठे पाठबळ असल्याचे काजलने आवर्जून सांगितले. सध्या शिरसाट कुटुंब पाल पुनर्वसन (कुडासे खुर्द), ता. दोडामार्ग येथे वास्तव्यास आहे. काजलने दंतचिकित्सक पदवी मिळवून पाल गावासह संपूर्ण दोडामार्ग तालुक्याचा मान उंचावला असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.