
कुडाळ : भारताच्या सार्वजनिक जीवनातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभाकर प्रभू यांच्या आयुष्यावर आधारित 'ध्येयधुंद' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे. ॲड. नकुल पार्सेकर लिखित हे पुस्तक स्वामीराज प्रकाशन आणि वर्धमान श्रुतगंगा ट्रस्ट यांच्या वतीने प्रकाशित केले जात आहे. दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ शिवजयंती दिनी सकाळी ११:०० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृह, छत्रपती शिवाजी पार्कजवळ, दादर (पश्चिम), मुंबई येथे होणार असून या दिमाखदार सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित असतील.
तसेच, सन्माननीय अतिथी म्हणून शशी प्रभू: विख्यात वास्तुविशारद, राजीव खांडेकर: कार्यकारी संपादक, एबीपी माझा, सतीश मराठे: संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्ड, गौतम ठाकूर: अध्यक्ष, सारस्वत बँक, जयराज साळगावकर: अर्थतज्ज्ञ तथा व्यवस्थापकीय संचालक, कालनिर्णय, प्रफुल्ल छाजेड: ज्येष्ठ सनदी लेखापाल तथा माजी संचालक, एस.बी.आय.'सुशासन, धोरण आणि लोकाभिमुखता' यांचा त्रिवेणी संगम असलेल्या सुरेश प्रभू यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा उलगडा या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. प्रकाशन सोहळा स्वागत समितीच्या वतीने ॲड. नकुल पार्सेकर, मोहन होडावडेकर आणि इतर सदस्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.










