
कणकवली : डोंबिवलीतील अखिल कोकण विकास महासंघाने यंदाच्या १८ व्या वर्षांचे १४ जणांना कोकणरत्न पुरस्कार जाहिर केले आहेत. सिंधुदुर्गातील ज्येष्ठ पत्रकार व गिरणी कामगार नेते गणपत तथा भाई चव्हाण यांच्यासह चित्रपट, मालिका क्षेत्रांतील हास्य कलावंत भाऊ कदम, हास्य अभिनेत्री शिवानी परब, दशावतारी कलावंत ओमप्रकाश चव्हाण, सामाजिक क्षेत्रातील डॉ. अमित दुखंडे या ५ मान्यवरांना यंदाचे कोकणरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.
या व्यतिरिक्त कोकणातील आणखी ९ मान्यवरांना हा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. शुक्रवार, ८ ऑगस्टला सायंकाळी ७.३० वाजता डोंबिवली पश्चिम येथील समाज मंदिर, घनश्याम गुप्ते मार्ग येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तानाजी परब , कार्याध्यक्ष मनिष दाभोलकर यांनी दिली आहे.
या कोकणरत्न पुरस्कारांमध्ये कोकणातील सामाजिक कार्यकर्ते संजय यादवराव, हास्य अभिनेते प्रभाकर मोरे, अभिनेत्री सौ. संजीवनी पाटील, मुंबई क्रिकेट संघाचे प्रशिक्षक दिनेश लाड, मराठी चित्रपट लेखक राजेश देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार आत्माराम नाटेकर, पखवाज सम्राट डॉ. दादा परब, भजन सम्राट प्रकाश चिले, अभिनेते मुकेश जाधव, पाॅवर लिफ्टटिंग सुशांत आगरे या ९ मान्यवरांचा समावेश आहे.