
सावंतवाडी : ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात ऊस या एका पिकातून आर्थिक विकासाची क्रांती झाली, अशा स्वरूपाची क्षमता कोकणामध्ये बांबू या पिकामध्ये आहे. सावंतवाडीतील जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आणि त्यांचे वडिल ख्रि. फ्रान्सीस यांनी जवळपास ४० एकरवर जवळपास दहा हजार बांबूच्या बेटांची लागवड केली. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने बांबूची शेती या कुटुंबाने केली आणि कोकणातील एक बांबू शेतीचे आदर्श मॉडेल निर्माण केले. फारशी पाण्याची आणि खूप काळजीची गरज नसलेले बांबू हे पीक कोकणातील शेतकऱ्यांसाठी वरदान आहे आणि एटीएम कार्ड आहे. वर्षभर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे काम बांबूची शेती करू शकते. उसा पेक्षा जास्त एकरी एक लाख हून अधिक उत्पन्न देण्याची क्षमता बांबू या शेतीमध्ये आहे . दहा एकर बांबूची लागवड करणारा शेतकरी कोकणात गावात राहून समृद्ध जीवन जगू शकतो.
कॉनबॅक ही बांबू वर प्रक्रिया करणारी आदर्श संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात आहे. या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बांबूची खरेदी करण्यात येते. याशिवाय स्थानिक पातळी पासून मुंबई पर्यंत अनेक विषयांसाठी बांबू लागतात त्यामुळे बांबूचे मोठ्या प्रमाणात मार्केट आहे. एकरी किमान एक लाख रुपयाचे उत्पन्न मिळवून देणारी बांबूची शेती ती प्रत्यक्ष मोठ्या प्रमाणात करणाऱ्या शेतकऱ्याकडून समजून घेण्यासाठी ऑनलाईन सेमिनार आयोजित केला आहे.
कोकणात असं वेगवेगळ्या क्षेत्रात क्रांतिकारी काम करणाऱ्या उद्योजकांचा सामाजिक कार्यकर्त्यांचा स्वातंत्र्याच्या ७५ वर्ष अमृत महोत्सवानिमित्त आणि कोकण भूमी प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात येणार आहे.समृद्ध कोकण चळवळीच्या दोन तपपुर्ती 23 वर्ष निमित्त भव्य कोकण आयडॉल पुरस्कार समारोह आयोजित करत आहोत.
रविवार 16 जुलै संध्याकाळी चार ते रात्री नऊ पर्यंत बी एन वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय दादर पूर्व येथे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कोकणातील असामान्य 75 व्यक्तिमत्त्वांना एकाच वेळी एकाच व्यासपीठावर भेटण्याची व त्यांचे असामान्य काम समजून घेण्याची संधी या निमित्ताने सर्वांनाच उपलब्ध होणार आहे.
यानिमित्ताने याच दिवशी कोकण आयडॉल परिषद आयोजित केली आहे. असामान्य काम करणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वांचे असामान्य अनुभव एकाच व्यासपीठावर ऐकता येतील.