![](https://kokansadlive.com/uploads/article/17194_pic_20250211.2007.jpg)
सिंधुदुर्गनगरी : वेंगुर्ले कॅम्प येथील तालुका संकुल येथे दि. १३ फेब्रुवारी पासून कोकण विभागीय महसूल क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. १३ ते १५ फेब्रुवारी असे तीन दिवस या स्पर्धा रंगणार आहे. याची जय्यत तयारी वेंगुर्ला कॅम्प मैदानावर सुरू आहे. या सोहळ्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार दिपक केसरकर, आमदार निलेश राणे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, कोकण विभागीय आयुक्त डॉ. राजेश देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यातील खेळाडू, अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
दैनंदिन ताण -तणाव कमी करण्यासाठी शारीरिक, मानसिक कार्यक्षमता वाढीसाठी सततच्या कामातून उत्साह मिळावा तसेच आपल्यातील सुप्तगुणांना वाव मिळावा या उद्देशाने महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्याची संकल्पना पुढे आली. या स्पर्धेच्या माध्यमातून संघभावना वृध्दींगत होते तसेच यश आणि अपयश याचा सामना करण्याची ताकद यातून मिळते त्यामुळे या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २४ जून २०१२ च्या शासन निर्णयास अनुलक्षून महसूल विभागांतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून दरवर्षी विभाग/ राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तद्नुसार विभाग स्तरावर दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात व राज्यस्तरावर जानेवारी महिन्यात कार्यक्रमाचे दरवर्षी नियमितपणे आयोजन करण्यात यावे असे महसूल व वन विभागाच्या २३ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयात नमुद आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६:०० ते ८:५० दरम्यान कालेलकर नाट्यगृह, तहसिलदार कार्यालयाशेजारी, वेंगुर्ला येथे सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देखील असणार आहे. क्रीडा प्रकार सकाळी १०:०० वाजता सुरू होणार आहेत. क्रीडा प्रकारात क्रिकेट, कब्बड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, थ्रोबॉल, कॅरम, बुध्दीबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन, रिंग टेनिस,
लॉन टेनिस, फुटबॉल, १०० ते ४०० मीटर धावणे (वैयक्तिक प्रकार- महिला, पुरूष ), उंच उडी (वैयक्तिक प्रकार- महिला, पुरूष ), गोळा फेक (वैयक्तिक प्रकार- महिला, पुरूष ), थाळी फेक (वैयक्तिक प्रकार- महिला, पुरूष ), ३ ते ५ कि.मी. चालणे (वैयक्तिक प्रकार- महिला, पुरूष ), लांब उडी (वैयक्तिक प्रकार- महिला, पुरूष ), ४ X ४०० मीटर रिले (वैयक्तिक प्रकार- महिला, पुरूष ) अशा विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. तसेच जलतरण प्रकारात ब्रेस्टस्टोक, फ्रि स्टाईल, बॅक स्ट्रोक अशा प्रकारांचा समावेश असणार आहे. क्रिकेट स्पर्धेत अनेक संघ सहभागी झाल्याने ही स्पर्धा १० फेब्रुवारी रोजी सुरू झाली. १२ फेब्रुवारी रोजी क्रिकेटचा अंतिम सामना मालवण येथे पार पडणार आहे.