
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे येथील भाजी विक्रेत्यांसह इतर व्यापाऱ्यांसाठी इंदिरा गांधी व्यापारी संकुलाजवळ तात्पुरती जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेले पत्र्याचे शेड अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे संत गाडगेबाबा भाजी मंडईतील व्यावसायिक आणि ग्राहकांना पावसाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या मागील बाजूस आणि स्टेट बँकेला जोडणाऱ्या या पत्र्याच्या शेडमधून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गळत आहे. त्यामुळे येथे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, कारण पावसामुळे त्यांचा माल भिजून खराब होत आहे. बांधकाम विभागाने केलेल्या या निकृष्ट कामाबद्दल व्यापारी आणि ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.नगर परिषदेचे मुख्याधिकारी पद रिक्त असल्याने या समस्येबाबत दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न आता व्यापारी विचारत आहेत. पावसाळ्यामुळे भाजी मंडईत येणाऱ्या नागरिकांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. उभारलेल्या या पत्राशेड आणि भरलची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी व्यापारी आणि ग्राहकांकडून केली जात आहे.