
कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या, कणकवली महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व आय.क्यू.ए.सी विभागाच्या वतीने माजी आमदार तथा शिक्षण महर्षी केशवरावजी राणे यांचा १५ वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.सर्वप्रथम कै.केशवरावजी राणे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी विचार मंचावर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा.डॉ. राजश्री साळुंखे, प्रमुख अतिथी डॉ.चंद्रकांत राणे, प्रमुख उपस्थिती डॉ.सविता तायशेटे, मंदार सापळे,प्र.प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. महादेव माने व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सीमा हडकर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. डॉ.राजश्री साळुंखे यांनी कै. केशवरावजी राणे यांच्या व्यक्तिमत्तवाचे विविध पैलू उलगडून सांगितले. साधी राहणी व उच्च विचारसरणी हा त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा गुण होता. आजच्या विद्यार्थ्यांनी तो निश्चितचं अंगीकारला पाहिजे असे मत व्यक्त केले. शिक्षण, ज्ञान, समृद्धी यांनी विचारांमध्ये एकवाक्यता येते. त्यामुळे शिक्षणाची कास धरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेवर भर देऊन राणे साहेबांचे स्वप्न साकार करावे असेही मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच प्रमुख पाहुणे डॉ. चंद्रकांत राणे यांनी कै. केशवरावजी राणे यांच्यासारखा चेअरमन होणे नाही असे मत व्यक्त केले. पुढे त्यांनी त्यांच्या शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कृषी विषयक क्षेत्रातील वावर हा किती लक्षणीय होता हे अनेक उदाहरणांसह पटवून दिले .त्यांच्या असंख्य जुन्या आठवणीतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंना उजाळा दिला.प्र.प्राचार्य युवराज महालिंगे यांनी ही "कै.केशवरावजी राणे यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत.ते जनसामान्य लोकांच्या मनपटलावर कोरलेले आहेत. अशा व्यक्तींचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत " असे मत व्यक्त केले.
तसेच प्रा. डॉ.सोमनाथ कदम यांनी कै.केशवराव राणे यांच्या फलोद्यान चळवळ आणि शेतीविषयक विचार व्यक्त केले. 'झाडे लावा, झाडे जगवा' या उक्तीप्रमाणे झाडे लावण्यासाठी त्यांनी केलेले विशेष प्रयत्न हे महत्त्वाचे होते असे सांगितले.
प्रा. डॉ.राजेंद्र मुंबरकर यांनीही "कै. केशवरावजी राणे हे कृषीप्रेमी असल्याने त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष योजना राबवल्या .त्यांनी आंबा ,काजू लागवड करण्यास शेतक-यांना प्रवृत्त केले. त्यांचे शेतीविषयक कार्य हे खूप महत्त्वाचे आहे. प्रा. हरिभाऊ भिसे यांनीही केशवरावजी राणे यांच्या कार्याविषयीचे महत्त्व विशद केले. पर्यवेक्षक प्रा. महादेव माने यांनी त्यांचे शैक्षणिक विचार विशद केले.
कै. केशवराव राणे यांनी कोकणात फलोद्यान चळवळ राबवण्याचा ध्यास घेतला होता. त्यांच्या विचारांना कृतिशील अभिवादन करीत वनस्पती शास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना १२५० सुरंगीच्या बीयांची रोपे वाटप करण्यात आली.या सुरंगीच्या बियापासून तयार झालेल्या रोपवाटिकाची ग्रामीण भागात लागवड व संवर्धन करण्यात येणार आहे. तसेच या निमित्ताने कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मीनाक्षी सावंत यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.सीमा हडकर व आभार प्रा. प्रवीण कडूकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगळवारी वृक्षदिंडी
दरम्यान, माजी आमदार कै. केशवरावजी राणे यांच्या फलोद्यान चळवळीला गती देण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने येत्या मंगळवारी २४ जून रोजी वृक्ष संवर्धन दिंडी आयोजित केली आहे अशी माहिती प्र.प्राचार्य युवराज महालिंगे यांनी दिली.