LIVE UPDATES

८५५ हून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कोकण संस्थेचा सामाजिक उपक्रम
Edited by: विनायक गांवस
Published on: June 12, 2025 16:19 PM
views 211  views

सावंतवाडी : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे ११ जून २०२५ रोजी, ८५५ गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात ५१ शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. हा उपक्रम आयोजित करण्यामागचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेलं शालेय साहित्य उपलब्ध करून देणे, अनेक वेळा आर्थिक अडचणीमुळे मुलांना पुस्तके, वह्या, पेन यांसारख्या मूलभूत गोष्टी मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचा अभ्यासातला रस कमी होतो आणि शालेय उपस्थितीही घटते. हे लक्षात घेऊन कोकण संस्था दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना मोफत शालेय किट्स वितरित करून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचे कार्य करते. 

२०१० मध्ये स्थापन झालेली ‘कोकण कला व शिक्षण विकास संस्था’ शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधांद्वारे वंचितांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्यरत आहे. सध्या ही संस्था महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमध्ये काम करत असून सुमारे ५०,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी संस्थानाचे युवराज लखमराजे भोसले यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  यावेळी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते बाळू देसाई, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर,व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष वामन तर्फे,  कोकणसादचे संपादक संदीप देसाई, दैनिक प्रहारचे पत्रकार प्रवीण परब, दैनिक सकाळचे हेमंत खानोलकर, सिंधुदुर्ग प्रसारक मंडळाचे जयप्रकाश सावंत, पंचम खेमराजचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. देविदास बोर्डे  यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले,

 “कोकण कला व शिक्षण संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जो शैक्षणिक आधार उभा करत आहे, तो अत्यंत प्रशंसनीय आहे. शासनाच्या योजनेसोबत अशा स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरते. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी अशी सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे असे मत संदीप देसाई यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल म्हणाले, "महाराष्ट्रातील वंचित मुलांना शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजा पुरवून त्यांना चांगले जीवन प्राप्त करण्यास आम्ही सक्षम बनवू. विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक साहित्याची कमी भासू नये. त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये. यासाठी कोकण संस्था सातत्याने कार्यरत आहे.”  या उपक्रमांतर्गत शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.

 कोकण संस्थेच्या वतीने साक्षी पोटे, ऋचा पेडणेकर, गौरी आडेलकर, हर्षला अमूप, बिना अहिरे, सुरज कदम, प्रथमेश सावंत, अमित पाटील, वैष्णवी म्हाडगूत, अवंती गवस, सत्यवान भगत, चेतन धरणे, अमोल गुरम सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होतेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी तर आभार प्रीती पांगे यांनी मानले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आणि भावना व्यक्त केल्या. त्यामधील काही विद्यार्थ्यांनी सांगितले, “या शालेय किटमुळे आमच्या अभ्यासात खूप मदत होईल. मिळालेल्या या साहित्यामुळे आम्ही नवीन शैक्षणिक वर्षासाठी खूप उत्सुक आहोत. अशा उपक्रमांद्वारे शिक्षणाचा प्रकाश ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवत, समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे कार्य कोकण संस्था यशस्वीरित्या पार पाडत आहे. हा उपक्रम यापुढेही सातत्याने सुरू राहील, असे आश्वासन कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिले.