
दोडामार्ग : दोडामार्ग तिलारी रस्त्यावरील कुडासा तिठा नजिक असलेल्या साईडपट्टीवर खड्डा खोदून त्यामध्ये काहीतरी दफन करण्यात आले आहे. दफन केल्यानंतर त्यावर फुलांची मोठी रास आणि त्यावर दगड ठेवण्याचा प्रकार उघड झाल्याने दोडामार्ग तालुक्यात विविध चर्चाना उत आला आहे. याबाबत ही घटना भेडशी येथील युवकांच्या जागृतेमुळे उघड झाली. रात्रीची वेळ असल्याने पोलिसांनी हा खड्डा सकाळी खोदून काय ते पाहू असे सांगितले. दरम्यान आज दुपारी याठिकाणी ही दफन केलेली जागा पुन्हा उकरण्यात आल्यानंतर त्यामध्ये मृत पाळीव कुत्रा दफन केल्याचे उघड झाल्याने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास या ठिकाणी दोन चारचाकी उभ्या असल्याचे या मार्गावरून जाणाऱ्या काहीजणांनी पाहिले होते. मात्र काही कामानिमित्त थांबले असतील असा त्यांचा समज झाला. सोमवारी दुपारी भेडशी येथील पांडुरंग बेळेकर यांना याठिकाणी काहीतरी पुरुन त्यावर फुले टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी नजीकच्या जमीन मालकांकडे चौकशी केली. मात्र त्यांनाही याबाबत काही माहिती नसल्याचे समजले.
दरम्यान बेळेकर यांनी ही गोष्ट आपल्याच गावातील काही जणांना सांगितली. सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास नेमका हा प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी भेडशी येधील पत्रकार जय भोसले, गोविंद शिरसाठ, दादा टोपले आदी ग्रामस्थ यांनी याठिकाणी जात पाहणी केली. सुरुवातीला हा प्रकार देव देवस्कीचा वाटत होता. मात्र नंतर अधिक जवळ जाऊन पाहिले असता याठिकाणी काहीतरी दफन केल्याचे दिसून येत होते. दरम्यान याबाबत दोडामार्ग पोलिसांना कळवताच बिट अंमलदार संजय गवस, पोलीस नाईक हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही पाहणी करून काहीतरी दफन केल्याचे स्पष्ट केले. मात्र रात्र असल्याने व संवेदनशील विषय असल्याने याबाबत त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधला. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे खोदकाम करून पाहणी करण्याचा आदेश वरिष्ट पातळीवरून असल्याचे पोलिसांनी सांगितले. काहीतरी घडल्याचे वृत्त पसरताच भेडशीतील युवक याठिकाणी दाखल झाले. त्यांनीही आताच काय तो सोक्षमोक्ष लावण्याची मागणी केली.
दरम्यान याबाबत दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्याशी पत्रकार गणपत डांगी यांनी संपर्क साधत घटनेबाबत गंभीरता स्पष्ट केली. चेतन चव्हाण लागलीच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. दरम्यान पोलिसांनी आता रात्र असल्याने उद्या सकाळी याचा तपास करूया असे सांगितले. तोपर्यंत याठिकाणी पालीस बंदोबस्त ठेवला जाईल असे आश्वासन दिले.
या घटनेवरून अनेक तर्कवितर्क व्यक्त होत होते. काहींच्या मते याठिकाणी एखादा पाळीव कुत्रा पुरल्याची चर्चा होती मंगळवारी दुपारी 1.00 वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने, पोलीस निरीक्षक हेमचंद खोपडे व साटेली भेडशी सरपंच छाया धर्णे, तलाठी, पोलीस पाटील, यांच्या समक्ष सदरचा खड्डा उघडण्यात आला. खड्डा खोदत असताना कुजलेला वास सर्वत्र पसरू लागला जसजसा खड्डा खोदून झाला तस लोकांच्या नजरा खड्ड्याकडे झूकू लागल्या पाहता तर काय त्याठिकाणी कुत्रा पुरल्याचे उघड झाल्याने साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला.