
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात महावितरणकडून विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे. दर तास दोन तासांनी लाईट ये-जा करत आहे. मंगळवारी तब्बल ७ वेळा तर आज दुपारपर्यंत ४ वेळा लाईट ये-जा करत आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणखीन झळ सोसावी लागत आहे. तर बॅ नाथ पै सभागृहात रात्री झालेल्या महाराष्ट्रातील दिग्गज कलावंतांच्या नाट्यप्रयोगात ३ वेळा लाईट गेल्यानं येथील कारभाराच 'वस्त्रहरण' प्रशासनाकडून झालं आहे.
या हाऊसफुल्ल नाट्यप्रयोगात अभिनेता अरूण कदम, प्रियदर्शन जाधव, अंशुमन विचारे, सुनील तावडे, किशोरी आंबिये, रेशम टीपणीस, दिगंबर नाईक आदींसह मराठी नाट्य, चित्रपट श्रृष्टीतील दिग्गज कलावंत उपस्थित होते. वस्त्रहरण" हे एक लोकप्रिय नाटक त्यांनी रसिकांच्या तुफान प्रतिसादात बॅ नाथ पै सभागृहात सादर केलं. मात्र, यावेळी महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका बसला. प्रयोगात तब्बल तिनं वेळा लाईट गेल्यानं व्यत्यय आला. जनरेटर असल्यानं सहावेळा प्रयोग थांबला. सिंधुदुर्गचे सुपुत्र अभिनेते दिगंबर नाईक यांनी प्रयोगात यावर तात्यांच्या शैलीत भाष्य करत वेळ मारून नेली. मात्र, सतत व्यत्यय आल्यानं प्रेक्षकांतून संताप व्यक्त केला गेला. अशाप्रकारे व्यत्यय येत राहिल्यास नाट्यप्रयोग करण्यासाठी दिग्गज कलाकार सावंतवाडीत का येतील ? असा सवाल उपस्थितांनी विचारला. यावर नगरपरिषद प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. मात्र, या सर्व प्रकारामुळे महावितरणच्या कारभाराच 'वस्त्रहरण' सभागृहात झालं. संपूर्ण दिवसभरात तब्बल ७ वेळा विद्युत प्रवाह खंडित झाला होता.
दरम्यान, बुधवारी सकाळपासून दुपारपर्यंत तब्बल चार वेळा लाईट ये-जा होत असल्यानं शहरवासीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महावितरण अधिकाऱ्यांनी यावर तात्काळ तोडगा काढावा असे आवाहन केले आहे. पावसाळ्यापूर्वीच्या तयारीसाठी संपूर्ण सहकार्य शहरवासीय करत आहेत. मात्र, सततच्या होणाऱ्या खंडीत प्रवाहामुळे ग्राहकांचे नुकसान होत आहे. त्यावर तोडगा न काढल्यास आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा शहरवासीयांनी दिला आहे. माजी नगरसेवकांसह वीज ग्राहक संघटनेच्यावतीने याबाबत महावितरण अधिकाऱ्यांच लक्ष वेधण्यात आले आहे.