
चिपळूण : कोकणात शाळेला विद्यार्थी ग्रामीण भागातून खूप लांबून चालत येतात त्यांचा निसर्गाशी रोजच संबंध येतो, त्याच बरोबर विद्यार्थ्यांची शेतीशी नाळ जोडली असल्यामुळे शेती करणे ही कमी प्रतीची गोष्ट नाही आधुनिक पद्धतीने ज्ञान घेऊन शेती केली तर आपण खूप काही मिळवू शकतो. स्वतःला सिद्ध करू शकतो आणि समाधानही मिळू शकतो. यावर त्यांनी चार पैशांच्या लागवडीतून 40 पैशांचे सुख आपल्याला प्राप्त होते. कोणतेही काम कमी महत्त्वाचे नसते, परंतु ते काम करताना एकाग्रतेने आणि चांगल्या पद्धतीने केले तर स्वतःचे वेगळेपण सिद्ध करता येते असा संदेश सौ.श्रीया केदार सोमण यांनी दिला.
परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलोरे येथे शुक्रवारी 7 फेब्रुवारी 2025 रोजी बारावीचा कला वाणिज्य विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या की, आपण किती काम करतो याला महत्त्व नाही तर ते किती चांगल्या पद्धतीने करतो याला खूप महत्त्व आहे. करिअर संदर्भात मार्गदर्शन करताना त्यांनी अमेझॉन ॲपचे उत्तम उदाहरण दिले , जसं की ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये निसर्गातील जैवविविधता आहे. त्याचप्रमाणे ॲमेझॉन ॲप वर विविध वस्तूंची विक्री केली जाते. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी गोवऱ्यांची देखील विक्री करून अर्थार्जण करू शकतो हे देखील त्याने विद्यार्थ्यांना सूचित केले.
शहरी जीवन आणि ग्रामीण जीवन जगताना ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टी अगदी उत्तमरीत्या त्यांनी उदाहरणातून स्पष्ट केल्या. देशभक्ती , देशप्रेम, आई-वडिलां प्रति आदर , प्रेम, त्यांच्याशी सुसंवाद संस्कार यावरही त्यांनी उत्तम मार्गदर्शन केले त्याचबरोबर रोजची जीवनशैली सुखकर कशी असू शकते हे कथेच्या माध्यमातून स्पष्ट केले . कौशल्य विकसनावर जास्त भर देऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले .
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ. सोमण यांनी आपले स्वानुभव कथित केले. खरंतर त्यांचे सर्व बालपण व शिक्षण पुण्यात झाले त्या बी.एस.सी. बी.एड म्हणून इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये तेरा वर्ष मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या . त्यानंतर त्यांनी मातीशी आपलं नातं जोडलं व आपल्या पतीबरोबर त्या शेती करू लागल्या. फक्त शेतीच नव्हे तर , नवनवीन उत्पादनासाठी त्या प्रयोग करू लागल्या आणि त्यातूनच त्यांनी व्हॅनिला व कॉफीची लागवड करून आधुनिक पद्धतीने शेतीला सुरुवात केली, हे अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडले. बारावीनंतर पुढे काय यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वाचासिद्ध सर तसेच पर्यवेक्षिका श्रीमती गमरे मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक वाचासिद्ध पर्यवेक्षिका श्रीमती गमरे प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व शाळा संस्था समन्वयक अरुण माने, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.