
चिपळूण : डाॅ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यांचे मार्फत घेण्यात येणारी अविष्कार: 2024 ही आंतरमहाविद्यालयीन संशोधनात्मक स्पर्धा दि.28 ते 29 डिसेंबर 2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज कृषि महाविद्यालय, ओरस या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये कोकण विभागातील सुमारे 29 कृषि व संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत मध्ये शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयामधील तीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक व दोन विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. यामध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान गटामध्ये कु. सार्थक सुर्वे ( प्रथम पारितोषिक) , ललित कला गटामध्ये कु. साहील काटकर ( प्रथम पारितोषिक) ,कृषि व पशुसंवर्धन गटामध्ये कुमारी वैष्णवी यादव ( प्रथम पारितोषिक) ,शुद्ध विज्ञान गटामध्ये कुमारी वेदिका अचरेकर ( द्वितीय पारितोषिक) व व्यवस्थापन, कायदा गटामध्ये कु. स्वयम दळी ( द्वितीय पारितोषिक) ई. विद्यार्थ्यांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट अश्या संशोधनात्मक विषयांचे सादरीकरण करण्यात आले.
या दैदीप्यमान यशाबद्दल चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे लोकप्रिय आमदार व सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले व त्यांना पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांचे हस्ते प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात आले यावेळी सह्याद्रि शिक्षण संस्था,सावर्डे चे सेक्रेटरी श्री.महेश महाडिक उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांना प्रा. रविंद्र माने यांचे मार्गदर्शन लाभले.