
सावंतवाडी : सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने दळवी ज्या शाळेत शिकले, त्या जीवन शिक्षण शाळेत आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याने आयोजित केलेल्या ‘सारे प्रवासी घडीचे’ या पुस्तकावरील चर्चेवरील वृत्तांत लेखन स्पर्धेत नेहल अक्षय मळगावकर याने प्रथम, तर असिफा अनिष शेख व मनस्वी प्रवीण दळवी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
आजगांव येथील गोगटे गुरुजी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या किशोर दिवाळी अंक परीक्षण स्पर्धेत रोहित अजित आसोलकर याने,पुस्तक परीक्षण स्पर्धेत खुशी मोहन परब हिने,तर पत्र लेखन स्पर्धेत सानिया चाँदसाहेब शेख हे विद्यार्थी विजेते ठरले.
दोन्ही स्पर्धांमधील विजेत्यांना नुकत्याच शिरोडा येथील खटखटे ग्रंथालयात संपन्न झालेल्या प्रेरणा साहित्य संमेलनात संमेलनाच्या अध्यक्ष प्रा.पौर्णिमा केरकर यांच्या हस्ते कै.जयवंत दळवी यांच्या ‘सारे प्रवासी घडीचे’ पुस्तक प्रदान करून गौरविण्यात आले.यावेळी व्यासपीठावर साहित्य प्रेरणा कट्ट्याचे विनय सौदागर,गोव्यातील नामवंत लेखिका सोनाली परब,कै.जयवंत दळवी यांची पुतणी शुभा दळवी व खटखटे ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे हे मान्यवर उपस्थित होते.
खटखटे ग्रंथालयाचा यंदाचा उत्कृष्ट विद्यार्थी वाचक पुरस्कार पटकावलेल्या आसिफ युसूफ आवटी या विद्यार्थ्याचाही यावेळी ‘सारे प्रवासी घडीचे’ पुस्तक प्रदान करून गौरव करण्यात आला.दोन्ही स्पर्धेतील पारितोषिके मांद्रे (गोवा) येथील ‘साहित्य संगम’ चे अध्यक्ष सुभाष शेटगांवकर व कार्यवाह प्रा.गजानन मांद्रेकर यानी पुरस्कृत केली होती.