
गोवा : कोंकणीतील ज्ञानपीठ विजेते लेखक दामोदर मावजो यांच्या एका विधानाने सध्या गोव्यात बराच गदारोळ माजवला आहे. १९८७ मध्ये पास झालेल्या राजभाषा कायद्यात आता दुरूस्ती करावी व त्यात मराठीला जो समान दर्जा आहे तो काढून टाकावा असा त्यांचा आग्रह आहे. अर्थात मराठीतील गोव्यातील वापराला किंवा मराठी पत्रांना सरकारने मराठीत उत्तरे देण्यास त्यांचा आक्षेप नाही. म्हणजे गोव्यातील मराठी भाषेचे स्थान त्यांना मान्य आहे परंतु सरकार दरबारी त्याची नोंद करण्यास मात्र त्यांचा विरोध आहे. ज्ञानपीठ विजेत्या या लेखकाला अचानक ३७ वर्षांनंतर हा साक्षात्कार कसा झाला? हा आश्चर्याचा विषय आहे. अनेकजण भाषा वादाचे भूत गाडले गेले आहे असे म्हणत असताना ते गाडलेले भूत पुन्हा उकरून काढावे असे या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकाला का वाटले असावे? हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न होता आणि विचार करताना मला जाणवले हे काही भावनेच्या भरात वगैरे केलेले विधान नाही तर अत्यंत जाणीवपूर्वक हे सर्व घडवून आणले गेले आहे. असा संशय प्रा. विनय ल. बापट यांनी व्यक्त केलाय.
यासाठी भाषा वादाच्या मुळाकडेही आपणाला जावे लागेल. १९८३ नंतर भाषा वादाने गोव्यात अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. गोव्याची राजभाषा कोणती असावी असा तो विषय होता. कोंकणी वाद्यांना फक्त कोंकणीच राजभाषा म्हणून हवी होती तर मराठी प्रेमीनां मराठीसह कोंकणी राजभाषा म्हणून हवी होती. गोव्यातील बहुजन समाजाच्या दररोजच्या बोलण्याची भाषा जरी कोंकणी असली तरी त्याची सांस्कृतिक व्यवहाराची भाषा मराठी आहे. तसेच धार्मिक व संस्कारांची भाषा म्हणून तो पूर्वापार मराठीकडे पाहात आला आहे. त्यामुळेच गोव्यातील सर्व धार्मिक वाङ्मय हे मराठीतच आहे. १५३० मध्ये कृष्णदास शामा यांने ‘श्रीकृष्ण चरित्रकथा’ हा ग्रंथ लिहिला जे मराठीतील पहिले श्रीकृष्णाचे चरित्र आहे. त्यांचे गुरू हे पंढरपूरचे होते. पंढरपूर हे मराठी साहित्याचे माहेरघर त्यामुळे हा ऋणानुबंध किती प्राचीन आहे हे आपल्या लक्षात येते. सामान्य माणसाला आजही मराठी आपल्या हृदयाची भाषा वाटते. जेव्हा १९१० नंतर पोर्तुगाल मध्ये प्रजासत्ताक राज्य निर्माण झाले व त्यामुळे येथील जनतेला काही सवलती मिळाल्या तेव्हा त्यांनी वर्तमानपत्रे काढली ती सर्व मराठीतून काढली व मराठी शिक्षणाला सुरूवात केली हे लक्षात घेतले पाहिजे हे असे करण्याचे मुख्य कारण सांस्कृतिक, धार्मिक व लिखित संप्रेषणांची भाषा म्हणून गोमंतकीय बहुसंख्य हिंदू समाज हा मराठीकडे पाहत आला आहे. आजही गोमंतकीय माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे आत्यंतिक आदर व आकर्षक आहे त्यामागे देखील ही मराठी प्रेरणाच कारणीभूत आहे. कोणी कितीही तर्क चालवले तरी आजपर्यंत कोंकणीतून प्राचीन काळी साहित्य निर्मिती होत होती याचा कोणताही पुरावा उपलब्ध होत नाही. अनेकजण हा तर्क देतात की पोर्तुगीजांनी ते साहित्य नष्ट केले पण हे लक्षात घेतले पाहिजे की प्रारंभीच्या काळात पोर्तुगीजांचे राज्य फक्त तीन तालुक्यांपुरते मर्यादित होते. बाकी सर्वत्र इतर राजवटीच होत्या मग तिथे कोंकणीतून साहित्य का निर्माण झाले नाही? काणकोण मध्ये ‘टके’ व ‘शमिपत्रे’ हे साहित्य प्रकार निर्माण झाले ते मराठीत झाले ते कोंकणीत का निर्माण झाले नाहीत? याचा अर्थ सरळ आहे. कोंकणीला लिखित परंपरा सुरूवातीला नव्हती ती बऱ्याच नंतरच्या काळात निर्माण झाली. गोमंतकीय हिंदू प्राचीन काळापासून ओठांवर कोंकणी व काळजात मराठी घेऊन वावरला आहे हे ऐतिहासिक सत्य आहे. पण जेव्हा भाषिक आंदोलन झाले तेव्हा हिंदूतील एक विशिष्ट समाज हा कोंकणी राजभाषा करण्यासाठी अग्रेसर होता किंबहुना तो त्यांनी आपल्या अस्मितेचा प्रश्न केला होता असेही म्हणता येते. पण आपणाला एका मोठ्या समाजाची साथ मिळाली तरच आपले इप्सित साध्य होणे शक्य आहे हे लक्षात आल्याने गोमंतकात मोठ्या संख्येने असलेल्या ख्रिस्ती समाजाला आपल्या सोबत ओढले. हा ख्रिस्ती समाज धर्मांतरणानंतर मराठी भाषेशी पूर्चपणे तुटलेला होता. व त्यांनी मध्यंतरीच्या काळात रोमी लिपीच्या माध्यमातून कोंकणी लेखनाला सुरूवात केली होती त्यामुळे हा समाज कोंकणीशी जोडलेला तर होतात पण त्याला मनापासून कोंकणी ही आपली अस्मिता वाटत होती व काही धार्मिक, राजकीय कारणांमुळे मराठी विषयीची एक सुप्त अढी या समाजाच्या मनात होती. मराठी राजभाषा झाल्यास गोवा महाराष्ट्रात जाईल व आपण अस्तित्वशुन्य होवू हा भय त्यांच्या मनात होता व या भाषा वादाने त्याला अधिक खतपाणी मिळाले. त्यामुळे हा समाज कणखरपणे या आंदोलनात उतरला, खरेतर आंदोलन याच समाजाने चालवले हे सत्य आहे. परंतु त्यांना कोंकणी हवी होती ती रोमी भाषेतील परंतु एका अर्थाने या समाजाचा आंदोलनासाठी वापर करून घेऊन या समाजाला पद्धतशीरपणे फसवले गेले.
राजभाषा कायद्यात देवनागरी लिपीतील कोंकणीला राजभाषा करण्यात आले परंतु मध्ये एक मराठीला सहभाषा म्हणून मान्यता अशी पाचरही मारण्यात आली. म्हणजे सर्व सरकारी कामकाजात मराठी वापरण्याची देखील मुभा देण्यात आली. मराठी राजभाषा केली गेली नाही हे शल्य आजही मराठी भाषाप्रेमींमध्ये आहेच परंतु किमान मराठी सगळीकडे हक्काने वापरता येते याचे समाधान त्यांना आहे. परंतु ख्रिस्ती बांधवांची रोमी कोंकणीला कोणतेच स्थान शिल्लक राहिले नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आपली फसवणूक आली तेव्हा त्यांनी आवाज उठवायला सुरूवात केली परंतु त्यांची अवस्था ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी झाली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यांनी रोमी कोकणीला राजभाषा करण्याचा विषय लावून धरला आहे त्यामुळे देवनागरी कोंकणी भाषिकात मोठी चलबिचल आहे कारण रोमीचे आंदोलन पेटल्यास सर्वात जास्त फटका देवनागरी कोंकणीला बसणार आहे. कारण कोंकणीच्या आंदोलनातील त्यांचा कणाच त्यांच्यापासून विभक्त होणार आहे.
भाषा वैज्ञानिक दृष्ट्या विचार करता कोकणींमध्ये जे स्वर व्यंजने वापरली जातात त्यांचे नेमके लेखन करण्यासाठी देवनागरी हीच उपयुक्त लिपी आहे कारण रोमीत तुम्ही ते सर्व स्वरांचे लेखन करू शकत नाही परंतु गोमंतक ख्रिस्ती जनतेसाठी तो भावनिक मुद्दा आहे आणि फसवणूकीचे शल्य आता मनात जाचत असल्याने ते रोमी कोंकणीला मान्यता मिळावी म्हणून आंदोलन करीत आहेत.
दुसऱ्या बाजूने मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात यावा म्हणून सुरूवातीपासून आंदोलने सुरूच आहेत परंतु मध्यंतरी अगदीच अडगळीत गेलेला हा विषय काही नवीन तरूण रक्ताचे नेते आता पुढे सरसावल्यामुळे पुन्हा धगधगू लागला आहे. आणि याची धास्ती कोंकणी मोगीनी घेतली आहे व या चक्रव्युहातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे कालचे मा. दामोदर मावजो यांचे भाष्य आहे.
राजभाषा कायद्यातून मराठी भाषेचा उल्लेख वगळा असे म्हटले की मराठी भाषक पेटून उठतील हे नक्की ( आणि ते तसे उठलेली कदाचित एवढ्या तीव्र प्रतिक्रिया उमटतील अशी कोणीच कल्पना केली नसावी) या मराठी प्रेमीच्या प्रतिक्रियेला उत्तर म्हणून सरकार राजभाषा कायद्यात कोणताही बदल केला जाणार नाही असे ठासून सांगेल. म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले जातील. मराठी प्रेमींना शांत करण्यासाठी सरकारने असे सांगितले तर मराठी प्रेमी मराठीला राजभाषा करण्याची जी मागणी करीत आहेत तीही आता मान्य केली जाणार नाही हे ही नकळतपणे निश्चित होईल व राजभाषा कायद्यात कोणताही बदल न करण्यावर सरकार ठाम राहणार असल्याचे रोमी कोंकणीला राजभाषा करण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. एका अर्थाने कोणाच्याही दबावाखाली येऊन चुकूनही सरकारने राजभाषा कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न करू नये म्हणून रचलेली ही खेळी आहे व ती बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाली आहे असे देखील म्हणता येईल.
पण संधीचा फायदा घेणे आता मराठी प्रेमी व रोमी कोंकणी प्रेमी या दोहोंनाही शक्य आहे. रोमी कोंकणीला राजभाषा करणे तसे अव्यवहार्य ठरेल कारण ती मागणी भाषिक निकषात बसत नाही परंतु लोकशाहीत अनेक निर्णय हे मतांच्या राजकारणावर होतात. आजपर्यंत रोमी राजभाषा करा म्हणून चाळीस पंचायतीनी ठराव पास केले आहेत हे या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे हे आंदोलन पेटल्यास व सर्व ख्रिस्ती समाज एकत्र झाल्यास राजकीय अपरिहार्यतेतून काहीही होणे अशक्य नाही. कदाचित याच परिस्थितीचा फायदा मराठी प्रेमी देखील उठवू शकतील व मराठी राजभाषा करण्याची मागणी लावून धरतील तर ती मागणी ही मान्य होणे अशक्य नाही. आज बहुजन समाज पुन्हा एकदा आपल्या मराठी अस्मिता जागवत आहे. गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे गोव्यात शिवजयंतीचे कार्यक्रम केले जातात ते त्याचे द्योतक आहे. हा शिव प्रेमी युवक मराठीच्या बाजूने ठामपणे उभा राहिल्यास मराठीची मोठी शक्ती निर्माण होईल हे नक्की. मा. दामोदर मावजो यांनी अत्यंत योजनापूर्वक हे विधान केले आहे ते आपला हेतू साध्य करतात की हे बुमरॅंग होईल हे येणारा काळच ठरवील, असंही त्यांनी म्हटलंय.