
वेंगुर्ला :वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर येथे गेली १० वर्षे सातत्याने गव्या रेड्यांकडून शेती व बागायतीची नासधूस होत असताना वारंवार तक्रार करून सुद्धा येथील शेतकऱ्यांना वनविभागाकडून संरक्षण मिळाले नसल्याचा आरोप करत याचे उत्तर घेण्यासाठी वनविभागाच्या सावंतवाडी कार्यालयावर मंगळवारी १३ ऑगस्ट रोजी धडक मोर्चा काढणार असल्याचा इशारा पेंडूर येथील शेतकरी बागायतदारांनी निवेदनाद्वारे वनविभागाला दिला आहे. पेंडूर सरपंच संतोष गावडे यांच्यासाहित शेतकरी व बागायतदारांनी याबाबत हे निवेदन दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पेंडूर गावात पावसाळी व उन्हाळी शेती केली जाते तसेच अनेक शेतकऱ्यांचे काजू, आंबा, कोकम अशा प्रकारची फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दहा वर्षात या पिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गव्या रेड्यांकडून वारंवार नासाधूस करून नुकसान होत आहे. खूप मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी उभी केलेली फळबाग लागवड व शेती डोळ्यादेखत गव्या रेड्यांकडून नष्ट केली जात आहे.
भौगोलिकदृष्ट्या विचार करता पेंडूर गावातील ९५ टक्के लोकांचे उपजीविकेचे साधन शेती व बागायती आहे परंतु गेली दहा वर्षे सातत्याने या गोव्या रेड्यांकडून होणाऱ्या नुकसानीबाबत आपल्या स्तरावर तक्रार करून सुद्धा आपल्या वनविभागाकडून कुठल्याही प्रकारची उपाययोजना किंवा शेतकऱ्यांना संरक्षण मिळालेले नाही. आज आमच्यासाठी उपजीविकेचे साधन शेती बागायती असल्यामुळे आम्ही जगावं की मरावं याचे उत्तर घेण्यासाठी आम्ही आपल्या कार्यालयावर दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आमच्या कुटुंबासह मोर्चा घेऊन येणार आहोत असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.