ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबईचा रौप्य महोत्सव ११ ऑगस्टला

Edited by: विनायक गावस
Published on: July 31, 2024 09:03 AM
views 152  views

सावंतवाडी : ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दादर पूर्व फिरदोशी रोड येथील सोहरब पालमकोट हॉल ट्रस्ट येथे विविध भरगच्च कार्यक्रमांसह ओटवणे गावातील ग्रामस्थांच्या कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मुंबईचे खासदार अरविंद सावंत, सिंधुदुर्गचे माजी खासदार विनायक राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यानिमित्त सकाळी १० वाजता मराठी अभंग व भावगीतांचा 'स्वर संध्या' हा सुरेल नजराणा प्रसिद्ध गायिका संध्या केळकर - बर्वे सादर करणार असून त्यांना संगित साथ निनाद चिले (तबला), निहार बाईत (संवादिनी), हेमंत मेस्त्री (पखवाज) यांची आहे. सकाळी ११:३० वाजता मान्यवरांच्याहस्ते रौप्य महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन, त्यानंतर मंडळाच्या रौप्य महोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन, आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता तिमीरातुन तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते तथा मुंबई सीमा शुल्क विभागाचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांचे शासकीय स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन, दुपारी २:३० वाजता मुंबईस्थित ओटवणे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सायंकाळी ३ वाजता हळदी कुंकू कार्यक्रम, सायंकाळी ३:३० वाजता महिला व मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ आदी कार्यक्रम होणार आहेत.ओटवणे ग्रामस्थ मंडळाची स्थापना १९९९ साली करण्यात आली. ओटवणे गावातील मुंबईस्थित ग्रामस्थांना आधारवड असलेल्या ओटवणे ग्रामस्थ मंडळाने ओटवणे गावच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान दिलेले आहे. या मंडळाच्या माध्यमातून ओटवणे गावातील चाकरमानी संघटित झाले असून मंडळाच्या या कार्यात आजपर्यंतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले योगदान दिले आहे. तसेच मंडळाच्या मुंबई येथील वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी पारितोषिक वितरण सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचा तसेच एका जेष्ठ ग्रामस्थ चाकरमान्याचा गौरव करण्यात येतो. ओटवणे गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही दरवर्षी गौरव करण्यात येतो.

       

ओटवणे वासियांसाठी अभिमानास्पद असलेल्या मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ दिनदर्शिका प्रकाशित करून करण्यात आला होता. तर रौप्य महोत्सवी वर्षाचा समारोप स्मरणिका प्रकाशित करून करण्यात येणार आहे. या स्मरणिकेत मंडळाच्या स्थापनेपासून पंचवीस वर्षातील कार्याचा आढावा घेऊन मंडळाच्या कार्यात योगदान दिलेल्या पदाधिकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे. मंडळाच्या या रौप्य महोत्सवी सोहळ्याला सर्व चाकरमान्यांसह ओटवणेवासियांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, सरचिटणीस रामचंद्र गांवकर, कार्याध्यक्ष गणपत गांवकर यांनी केले आहे.