KOKAN POLITICS | थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये धडाडणार तोफ

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा जाहीर पक्षप्रवेशही होणार
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 05, 2023 16:20 PM
views 137  views

रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांची आज रत्नागिरीत सभा होणार आहे. रामदास कदम यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या रत्नागिरीत ही सभा होणार असल्याने उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खेडमधील गोळीबार मैदानात सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांचा जाहीर पक्षप्रवेशही होणार आहे.


माजी मंत्री रामदास कदम यांचे निकटवर्तीय माजी बांधकाम सभापती विश्वासकाका कदम हे देखील पक्षात प्रवेश करणार आहेत. दरम्यान, खेडमधील गोळीबार मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे. लाख ते सव्वालाख लोकांची क्षमता असणारे हे मैदान आहे. या व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व नेते, आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.


दुसरीकडे आज मुंबईत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची आशीर्वाद यात्रा निघणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व दोन्ही पक्षांचे नेते त्यात सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यावर जनजागृती करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून सहाही लोकसभा मतदारसंघांत दुचाकी फेरीच्या माध्यमातून आशीर्वाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानापासून आशीर्वाद यात्रेची सायंकाळी पाच वाजता सुरुवात होणार आहे आणि रात्री नऊ वाजता मुंबादेवी येथे समारोप होणार आहे.