
सावंतवाडी : कै.प्रा.उदय खानोलकर वाचन मंदिर मळगावच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने वाचनालयाच्या सभागृहात "काव्यांजली" हा कविता वाचन व गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कवितेविषयी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी को.म.सा.प. सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर यांनी कविता म्हणजे कवीच्या भावना आणि विचारांची अभिव्यक्ती आहे. कविता ही अंतरीतून स्फुरते आणि जी अंतरीतून येते तिच्यात शब्दसौंदर्य असते, तीच श्रोत्यांच्या मनाला भावते" असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश खानोलकर होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस, मळगाव इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष मनोहर राऊळ, वाचन मंदिर उपाध्यक्ष बाबली नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे अध्यक्ष महेश खानोलकर यांच्या हस्ते शुभेच्छा पत्र देऊन शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महेश खानोलकर यांनी वाचनालयाच्या आजपर्यंतच्या वाटचाली विषयी माहिती दिली. कोरोनाच्या काळापर्यंत वाचनालयात बऱ्याच प्रमाणावर वाचक संख्या होती. परंतु, कोरोनानंतर वाचकांची संख्या कमी झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवत मुलांनी वाचनालयाकडे पुन्हा एकदा यावे असे आवाहन केले. तद्नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मुख्य काव्यांजली या कविता वाचन गायन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. काव्यांजली कार्यक्रमांतर्गत मळगाव इंग्लिश स्कूलच्या बालकवींनी निसर्ग, पाऊस, श्रावणसरी, मुंगी, देशप्रेम, ज्ञानदीप, झाड, फळा, उंदीर, चतुर्थी, आई, आजी आजोबा, सैनिक, अशा अनेक विषयांवर स्वरचित काव्य रचना सादर केल्या. यामध्ये मळगाव इंग्लिश स्कूलच्या ५ वी ते दहावी पर्यंतच्या मुलामुलींनी सहभाग घेतला होता. एवढ्या लहान वयात अतिशय सुरेख काव्यरचना लिहिणाऱ्या आणि व्यासपीठावर बिनधास्त सादर करणाऱ्या मुलांचे कवी दीपक पटेकर यांनी विशेष कौतुक केले. यावेळी प्रशालेच्या शिक्षिका प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत भोसले, रितेश राऊळ, सौ. सुधा देवण, सौ. मौर्ये, नितीन वराडकर, कृतिका राणे, ऋतुजा जाधव आदींनी स्वरचित कविता सादर केल्या. दोडामार्ग येथून आलेले कवी रामचंद्र शिरोडकर यांनी आपल्या मालवणी व मराठी कविता गाऊन सादर केल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली तर असे जगावे ही विंदा करंदीकर यांची कविता वाचन करून गौरी डिचोलकर हिने जगण्याचे प्रेरणा दिली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात कवी दीपक पटेकर यांनी आपल्या दोन गझला सादर करून उपस्थित बालकवींना कविता कशी लिहायची, कविता लिहिण्यासाठी आवश्यक असणारे लय, ताल, प्रतिमा, रुपक, अलंकारिक भाषा शैली, यमक, आणि विपुल शब्द निवड याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. क्लिष्ट कठीण शब्द कवितेत अजिबात लिहू नयेत तर साधे सोपे शब्द वाचकांच्या मनाला भिडतात असे सांगून शब्दांचे भांडार वाढविण्यासाठी नवकवींनी इतर कवींच्या कविता वाचल्या पाहिजेत. "वाचाल तर वाचाल" या डॉ.बाबासाहेबांच्या वाक्याची आठवण करून देत मुलामुलींनी कवी, लेखक, साहित्यिक होण्यासाठी प्रथम वाचन कला आत्मसात केली पाहिजे असे प्रतिपादन केले. यावेळी मळगाव सारख्या छोट्याशा गावात ज्ञानसेवेची २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या पदार्पण करून रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या कै.प्रा.उदय खानोलकर वाचन मंदिर मळगावच्या उपक्रमांचे दीपक पटेकर यांनी कौतुक केले. यावेळी मळगाव इंग्लिश स्कूलमधून दहावीत पहिल्या चार क्रमांकात आलेल्या मुलामुलींचा सन्मान सोहळा पार पडण्यात आला. यात प्रथम आलेली निधी राऊळ, द्वितीय चैताली राऊळ, तृतीय याहीका साटेलकर, चतुर्थ जान्हवी अमरे यांच्यासह यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठातून इतिहास विषयात सुवर्ण पदक मिळालेल्या प्रसन्न सोनुर्लेकर याचा ग्रंथभेट देत सन्मान करण्यात आला. या वाचन मंदिर मुळेच आज आपण या स्तरापर्यंत आल्याचे प्रसन्न याने अभिमानाने सांगितले.
यावेळी खास कार्यक्रमासाठी प्रा.सुभाष गोवेकर, मळगाव इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक फाले सर, वाचनालयाचे सदस्य, कर्मचारी, मळगाव इंग्लिश स्कूलची मुले, पालक, आणि वाचनालयाचा वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा खानोलकर यांनी केले तर आभार चंद्रकांत जाधव यांनी मानले.