वाडातर येथील श्री हनुमान मंदिरात लघुरुद्राभिषेक सोहळा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 06, 2025 11:49 AM
views 62  views

देवगड  : दीक्षित फाऊंडेशन च्या वतीने व तरुण विकास मंडळ- वाडातर यांच्या सहकार्याने वाडातर येथील श्री हनुमान मंदिरात लघुरुद्राभिषेक सोहळा नुकताच संपन्न झाला.यावेळी या लघुरुद्राभिषेक सोहळ्या निमित्त मोठ्यासंखेने भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. या निमित्त बोलताना निरंजन दीक्षित म्हणाले कर्मभूमी पडेल, पुरळ व हुर्शी या भागांशी माझं नातं घट्ट विणलेलं आहे.जामसंडेहून वाडातर परिसरात येणे-जाणे कायमचे असायचे. वाडातर पुलावरून मंदिराचे दर्शन घेत श्री बजरंगबलींना मनोभावे वंदन करत असे. मात्र, प्रत्यक्ष मंदिरात जाऊन प्रभुंच्या चरणी नतमस्तक होण्याचा संकल्प मनी बाळगून आपण येथे आलो. श्री हनुमानाच्या पवित्र दर्शनाने विलक्षण ऊर्जा लाभली. माझ्यासारख्या भक्तासाठी हा योग लघुरुद्राभिषेक सोहळ्यानिमित्त जुळून आला. यासाठी आपण तरुण विकास मंडळाचे विशेष ऋणी असल्याचे यावेळी दीक्षित फाऊंडेशनचे निरंजन दीक्षित म्हणाले 

दीक्षित फाऊंडेशनच्यावतीने व तरुण विकास मंडळ- वाडातर यांच्या सहकार्याने वाडातर येथील श्री हनुमान मंदिरात लघुरुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

दीक्षित पुढे म्हणाले, बजरंगबलीमध्ये भक्तांना आपलंसं करून ठेवण्याची अनोखी शक्ती आहे.मुंबईत कामानिमित्त असताना गावी येण्याचा योग आला आणि श्रावणी शनिवारनिर्मित वाडातर हनुमान मंदिरात लघुरुद्राभिषेक करण्याचा संकल्प मनात आला. येथील कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे तो संकल्प काही क्षणातच साकार झाला.

यावेळी सकाळच्या सत्रात मंदिरात लघुरुद्राभिषेक विधी पार पडला. यावेळी तरुण विकास मंडळाच्यावतीने दीक्षित यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेश देवळेकर, पडेलचे माजी सरपंच विकास दीक्षित, भूषण बोडस, रवींद्र तिर्लोटकर, वैभव करंगुटकर, कमलाकर जुवाटकर, रामचंद्र चोपडेकर, संदीप वाडेकर यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.