
दापोली : दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील मच्छी ओटे यांचे झालेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी दापोलीतील मयूर मोहिते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता व पत्तन विभाग यांच्याकडे केली होती. त्यानुसार नुसार आज गुरुवारी कोकण भवन येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता व गुणनियंत्रण पथकाने प्रत्यक्ष बुरोंडी येथे येऊन पाहणी केली. मात्र तक्रार मयूर मोहिते यांनी केलेल्या तक्रारीनुसार पाहणी केली नसल्याचा आरोप करून मयूर मोहिते यांनी आज दुपारपासून दापोलीतील पतन विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
पत्तन विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राकेश जाधव यांच्या अखत्यारीत करण्यात आलेली सर्व कामे ही सरकारी नियमांस अनुसरून केली गेली नाहीत. या कामांची चौकशी करावी या मागणीसाठी मोहिते यांनी वारंवार उपोषण केले. २६ जानेवारी २०२५ रोजी केलेल्या उपोषणा दरम्यान मोहिते यांना पाजपंढरी व बुरोंडी येथे करण्यात आलेल्या कामांची दक्षता व गुणनियंत्रण विभागाकडून तपासणी केली जाईल असे लेखी आश्वासन देण्यात आले होते.
त्यानुसार आज कोकण भवन येथील दक्षता विभागाचे पथक बुरोंडी येथे दाखल झाले. त्यांनी बुरोंडी येथील जेटीची व मच्छी ओट्यांची पाहणी केली मात्र यावेळी ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे. ते राकेश जाधव स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी तक्रारदार मयूर मोहिते यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या तक्रारीबाबत वारंवार सांगून तपासणीचा आग्रह धरला. मात्र त्याकडे या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करत तपासणी उरकली असल्याचा आरोप मोहिते यांनी केला असून जोपर्यंत आपल्या तक्रारीनुसार या कामाची सखोल तपासणी होत नाही तोपर्यंत आपले ठीय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे मयूर मोहिते यांनी पत्रकारांना सांगितले.