बेजबाबदार गुरांच्या मालकांवर कारवाई करा

उभादांडा ग्रामस्थांची पोलिसांकडे मागणी
Edited by: दिपेश परब
Published on: March 22, 2025 12:02 PM
views 687  views

वेंगुर्ला : उभादांडा गावात काही बेजबाबदार गुरांचे मालक आपली गुरे दिवसा तसेच रात्रीची मोकाट सोडून देत असल्याने गावातील गोरगरीब भाजीपाला शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे ही गुरे नुकसान करत आहेत. याबाबत वारंवार संबधित गुरांच्या मालकांना कल्पना देऊन सुद्धा त्यात काही सुधारणा होताना दिसत नाही. याउलट गुरांचे मालक शेतकऱ्यांना दमदाटी  करत आहेत. यामुळे या गुरांच्या मालकांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले तसेच सरपंच निलेश चमणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

या निवेदनात ग्रामस्थांनी असे म्हटले आहे की, उभादांडा गावात बरेच शेती व भाजीपाला करणारे शेतकरी असून रात्रदिवस मेहनत घेऊन शेती करत आलेले आहेत. गावात काही बेजबाबदार गुरांचे मालक आपली गुरे दिवसा तसेच रात्रीची देखील सोडून देत आहेत. आणि ही सर्व गुरे या गोरगरीब भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांचे दिवसेंदिवस अतोनात नुकसान करत आहेत. वारंवार संबधित गुरांच्या मालकांना याची कल्पना देऊन देखील त्यात काही सुधारणा होताना दिसत नाही. उलट दमदाटी हया शेतकऱ्यांना करून आमची गुरे नाहीत असे सांगितले जाते.

या गुरांचा त्रास फक्त शेतकरी वर्गाला नसून रात्री अपरात्री शिरोडा, वेंगुर्ला मुख्य रस्त्यावर ये-जा करणाऱ्या लोकांना त्रास होत आहे. काही दिवसापूर्वी उभादांडा गावातील मोटर सायकल स्वार यात गंभीर जखमी होऊन त्याला गोवा मेडिकल कॉलेज व त्यानंतर मुंबई मध्ये नेण्यात आले. त्यांचा उजवा हात पूर्ण निकामी झाला. आशा रोज घटना घडत आहेत. आणि बेजबाबदार गुरांचे मालक पहाटे गाय, म्हैस फक्त दुध काडण्यासाठी त्यांचा वापर करतात पण त्यांच पालन पोषण करताना दितस नाहीत. एखादया वाहनाकडून गुरे गंभीर जखमी झाली तर मात्र त्यांच्या कडून पोलीसांची भिती दाखवून पैशाची मागणी केली जाते.

वेंगुर्ला पोलिस ठाण्यात आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे की आपण संबधित बेजबाबदार गुरांच्या मालकांना बोलावून त्यांना योग्य ती समज दयावी किंवा त्यांच्यावर कारवाई करावी. कारण उभादांडा सोडून लगतच्या, मोचेमाड, न्हेयचीआड, अणसूर, होडावडा, तुळस, मातोंड या गावात उघडयावर शेती केली जाते. कोणतेही कुंपण केले जात नाही. कारण गुराचे मालक दिवसा तसेच रात्री आपली गुरे कोणीही सोडून देत नाहीत. दिवसा स्वतः मालक त्यांच्या सोबत राहतो. उभादांडा गावात शेतकरी तीन तारांचे कुंपण घालून देखील गुरे ते मोडून शेतीचे नुकसान करतात. शासनाकडून आज पर्यंत कोणतीही हया शेतकरी वर्गाला भरपाई मिळालेली नाही. तरी याची दखल घ्यावी असे निवेदन सामाजिक कार्यकर्ता कार्मिस आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली उभादांडा ग्रामस्थांनी पोलिसांना दिले आहे. 

यावेळी पंचायत समिती माजी सभापती जयप्रकाश चमणकर, मोतेस आल्मेडा, क्लेबिन आल्मेडा, जॉन आल्मेडा, घाब्रू आल्मेडा, आंतोन आल्मेडा, मारुती मांजरेकर, नागेश जुवलेकर, कृष्णकुमार आरोलकर, कृष्णकांत नाईक, सुनील कांबळी, दियोग डिसोजा, उमेश आरोलकर, कुस्तान डिसोजा, आनमारी आल्मेडा, पास्कु आल्मेडा आदी उपस्थित होते.