छत्रपती ब्रिगेड मार्फत विजयदुर्ग किल्ल्यावर तोफगाडा लोकार्पण सोहळा

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 17, 2025 18:39 PM
views 17  views

देवगड : किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांनी खड्या आवाजात म्हटलेल्या शिवप्रार्थनेने आणि शिवगर्जनेने विजयदुर्ग किल्ला थरारून गेला. ढोलताशांच्या गजरात सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता विजयदुर्ग गडाची विधीवत पूजा करून कोल्हापूर येथील छत्रपती ब्रिगेड मार्फत तोफगाडा लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. विजयदुर्ग अष्टशताब्दी किल्ले महोत्सवाचे अध्यक्ष तथा धुळप घराण्याचे वंशज सरदार रघुनाथराव धुळप यांच्या हस्ते पूजन करून तोफगाडा अर्पण करण्यात आला.

यावेळी बाॅनी नोरोन्हा, सरपंच रियाज काझी, विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती अध्यक्ष प्रसाद देवधर, सह्याद्री प्रतिष्ठानचे कोकण सचिव दिपक करंजे, विठ्ठलवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय सावंत, युवा उद्योजक शंकर सागवेकर, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बिडये, माजी उपसरपंच महेश बिडये, प्रदीप साखरकर, ग्रेसीस फर्नांडिस, व्यावसायिक विद्याधर माळगांवकर, सुरेश उर्फ अण्णा सावंत, यशपाल जैतापकर, मिलिंद वाडये, गीता लळीत आणि असंख्य विजयदुर्गवासीय उपस्थित होते. तसेच कोल्हापूर येथील छत्रपती ब्रिगेडचे अतुल माने यांच्यासह सत्यजित पवार, संदीप जाधव, श्री. व सौ. शिवाजीराव कागीलकर, रवी मोरे, तोफगाड्याची निर्मिती करणारे प्रद्युम्न सुतार यांच्यासह वीस कार्यकर्ते या तोफगाडा अर्पण सोहळ्यात सामील झाले होते.

   सुरुवातीला विजयदुर्ग किल्ल्याच्या प्रमुख प्रवेशद्वारावर सरदार रघुनाथराव धुळप यांच्या हस्ते गडकिल्ल्याचे पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि विजयदुर्ग येथील शिवप्रेमी उपस्थित होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात सर्व शिवप्रेमी भवानी मातेच्या मंदिराकडे मार्गस्थ झाले. या ठिकाणी तुळजाभवानीचं पूजन आणि आरती करण्यात आली. यानंतर सर्व जण मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवण्यात आलेल्या तोफगाड्यावर आले. सरदार धुळप यांच्या हस्ते तोफगाड्याची पूजा करून हा तोफगाडा लोकार्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळाच्या वतीने विद्याधर माळगांवकर यांच्या हस्ते आणि यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिलेल्या सदस्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान, सरदार रघुनाथराव धुळप यांनी छत्रपती ब्रिगेडच्या या शिवकार्यासाठी दहा हजार रूपयांची देणगी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव परुळेकर यांनी केले.