
सावंतवाडी : माडखोल गावात शासनाने चार वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजना मंजूर करूनही अद्याप या योजनेचे काम सुरू करण्यात आलेले नाही. पर्यायाने या योजनेचा निधी परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या चार दिवसात या योजनेचे काम सुरू न केल्यास ग्रामपंचायतीसमोर शुक्रवारी २१ मार्च रोजी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा माडखोल गाव विकास संघटनेच्या दत्ताराम तुकाराम राऊळ, आनंद पुंडलिक राऊळ, संजय मुकुंद राऊळ, राजकुमार लक्ष्मण राऊळ, विजय सावळाराम राऊळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.
याबाबत दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात्र म्हंटले आहे की, माडखोल गावात धरण असूनही व ग्रामपंचायतीने शासनाचे करोडो रूपये खर्च घालूनही केवळ ग्रामपंचायतीच्या उदासीन, अकार्यक्षम, नियोजनशुन्य कारभारामुळे माडखोल गावात पाण्याचे दुर्भिक्ष गेली बरीच वर्षे जाणवत आहे. माडखोल गावात पाण्याची गंभीर समस्या असल्यामुळे २०२०-२०२१ मध्ये गावासाठी जलजिवन मिशन योजना शासनाने मंजूर केली. मात्र पंचायतीच्या उदासिन कार्यपद्धतीमुळे गेल्या चार वर्षात जलजिवन मिशन योजनेचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. हे अत्यंत दुदैवी व खेदनीय आहे. सदर योजना गेल्या पाच वर्षात सुरू न केल्याने या योजनेचा मंजूर निधी परत जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
तसेच माडखोल गावात पाणीपुरवठा करण्याबाबत सुरवातीपासूनच केलेले चुकीचे नियोजन, शासकीय निधी उचलण्याकरीता चुकीच्या व संमिश्र पद्धतीने राबविलेल्या योजना, पाणी पुरठ्याबाबत ग्रामसभा अगर मासिक सभा यांना विश्वासात न घेण्याची वृत्ती, वरीष्ठ जाणकारांचे मार्गदर्शन न घेता योजना राबविणे, पाण्याच्या तक्रारी असलेल्या प्रचलित जुन्या योजनेचेच नुतनिकरण करण्याबाबत अंदाजपत्रे तयार करून घेवून ते शासन दप्तरी वेळोवेळी सादर केले व त्याप्रमाणे कार्यवाही केली त्यामुळे माडखोल गावातील पाण्याचा प्रश्न जटील होत गेला. परंतू सदरची बाब ग्रामपंचायत सदस्य व जागरूक ग्रामस्थ यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जलजिवन मिशन योजनेबाबत वेळोवेळी हरकती उभारल्या, प्रसंगी आंदोलने छेडली व पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने योजनेमध्ये नव्याने बदल करून योजना राबविण्याबाबत ग्रामसभेमध्ये सुचना केलेल्या आहेत.
संपूर्ण माडखोल गावासाठी जलजिवन मिशन योजने अंतर्गत जवळपास दीड ते दोन कोटी रूपये मंजूर असून सदर निधीचा ग्रामस्थांनी सुचविलेल्या सुचनेप्रमाणे योग्य नियोजन करून वापर केल्यास गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेला माडखोल गावातील पाण्याक्षा प्रश्न सहज सुटू शकतो. मात्र ग्रामसभेच्या ठरावाप्रमाणे देखील आपण कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामपंचायत हे ग्रामविकासातील सगळ्यात महत्वाचे असे अढळ घटकस्थान आहे. गावाचा सर्वागिण विकास हा ग्रामपंचायतीच्या कारभारावरच सर्वस्वी अवलंबून असतो. गावात सुरळीत पाणी पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे मुलभूत कार्य आहे.
सध्या ऐन उन्हाळ्याचा हंगाम चालू झालेला असून पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत जाणारा आहे. तरी आपण पुढील चार दिवसात जलजिवन मिशन योजना राबविण्याबाबत आवश्यक असणारी सर्व पुर्तता करावी व तात्काळ जलजिवन मिशन योजनेचे काम चालू करून गावास सुरळीत पाणीपुरवठा होईल याची सोय करावी. तसेच माडखोल बामणादेवी येथील लघु नळपाणी योजना तयार करणे हे काम देखील गेली तीन वर्षे संबधित ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे व सदर ठेकेदारावर आपले नियंत्रण नसल्यामुळे आजतगायत अर्धवट स्थितीत वाऱ्यावर पडल्यासारखे पडून आहे. तसेच माडखोल धवडकी परीसरातील लघु नळपाणी योजना तयार करणे हे काम देखील सर्व सोपस्कार पूर्ण करून तात्काळ चालू करणे आवश्यक आहे. आपण जलजिवन मिशन योजने अंतर्गत माडखोल गावातील प्रलंबित सर्व कामांची आवश्यक पुर्तता करून सदर कामे पुढील तात्काळ चालू न केल्यास अगर आपल्या अकार्यक्षम कारभारामुळे सदर जलजिवन मिशन योजनेचा निधी परत गेल्यास त्यास ग्रामपंचायतीला जबाबदार धरणार असल्याचे या नमूद करण्यात आले आहे.