
सावंतवाडी : ग्राहकांना पुर्वकल्पना न देता शहरातील बाहेरचावाडा भागात वीज मीटर बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंत्राटी कर्मचार्यांना संतप्त नागरिकांनी रोखत वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला धडक दिली. जो पर्यंत ते मिटर पुन्हा बसवत नाही तो पर्यत अधिकार्यांना कार्यालयात बसू देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. यावेळी कार्यालयाकडून कल्पना देणे आवश्यक होते. परंतू, तसे झाले नसल्याने उपकार्यकारी अभियंता यांनी दिलगिरी व्यक्त करत ते मिटर पुन्हा बसवून देण्याची तयारी दर्शविली.
बाहेरचावाडा परिसरात आज वीज कंपनीने नेमलेल्या कंत्राटी कर्मचार्यांकडुन वीज मीटर बदलण्याचे काम सुरू करण्यात आले होते. घरात असलेले मीटर काढून ते थेट पोलवर लावण्यात आले. यावेळी अचानक अशा प्रकारे मोहीम राबविली जात असल्यामुळे तेथील नागरिकांनी विरोध केला असता मीटर बदलण्याचे आदेश आमच्याकडे आहेत. त्यानुसार आम्ही हे काम करीत आहोत असे सांगुन कर्मचार्यांनी उध्दट उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त झालेल्या नागरीकांनी याबाबतची माहिती लोकप्रतिनिधींना दिली.
यावेळी माजी नगरसेविक राजू बेग, दिपाली भालेकर, ठाकरे शिवसेनेचे संघटक शब्बीर मणीयार, शहर अध्यक्ष शैलेश गवडंळकर यांनी नागरीकांना घेवून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक दिली.
यावेळी ग्राहकांना कल्पना न देता चुकीच्या पद्धतीने मीटर बदलण्यात येवू नयेत.जो पर्यंत ते मिटर पुन्हा बसवत नाही तो पर्यत अधिकार्यांना कार्यालयात बसू देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. आमचे उपवास सुरू आहेत अशा काळात नाहक त्रास देण्यासाठी वीज कंपनीकडून हा प्रकार सुरू आहे असा आरोप माजी नगरसेवक राजू बेग यांनी केला. तसेच घरात पुरूष मंडळी नसनाता कंत्राटी कर्मचारी मीटर काढण्यासाठी करीत असलेली दादागिरी चुकीची आहे. हा प्रकार योग्य नसून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी दीपाली, आणि समिरा खलील यांनी केली.
यावेळी झालेला प्रकार हा चुकीचा आहे. संबंधितांना समज देतो तसेच आगाऊ कल्पना दिल्याशिवाय पुढील काम करणार नाही. तसेच काढलेले मीटर पुन्हा जोडून दिले जातील, असे आश्वासन अभियंता श्री. राक्षे यांनी दिले. त्यानंतर उपस्थित नागरिक शांत झाले. यावेळी आनंद आयरे, अर्शद शेख, जाकिया शेख, बिलाल दुर्वेश, परवेज तुरेकर, सरफराज शहा, जियान जुगारी, मुस्ताक बागवान, आमीन खलील, नदीम दुर्वेश, शादिर शेख आदी उपस्थित होते.