
सावंतवाडी : खासकीलवाडा साधले मेसच्या बाजूला चाललेल्या बांधकामावर कारवाई करण्याबाबत कोकण रिक्षा टॅक्सी महासंघ सहसचिव सुधीर पराडकर यांनी प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे. राजवाड्याच्या बाजूला असलेल्या साधले मेस नजीक चाललेल्या बांधकामाची खोदाई बेकायदेशीर केली जात आहे. मेनरोडला टेकून खोदाई केल्यामुळे दोनच दिवसापूर्वी विद्युत महामंडळाचा इलेक्ट्रीक पोल चालू लाईनसह कोसळला व दोन दिवस लाईट बंद होती. रस्त्याच्या कडेपर्यंत खोदाई चालल्यामुळे मेनरोड सुध्दा कोसळण्याची भिती आहे. त्याकडे बांधकाम अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत आहे की जाणूनबुजून हे केले जात आहे याचा खुलासा करावा असे श्री. पराडकर यांनी व्यक्त केले.
तसेच मुख्य म्हणजे बांधकामाची रितसर परवानगी घेतली जात असेल तर नगरपालिकेच्या बाजूने घातलेली संरक्षक भिंत बेकायदेशीर आहे ती नियमाप्रमाणे किती मीटर असावी याचा खुलासा करावा. खोदाई करणारे नगरपालिकेच्या बांधकामाच्या नियमात खोदाई करीत आहेत का ? तसेच त्यांच्या प्लॉटच्या समोर नगरपालिकेच्या कायम वर्दळ असलेल्या रस्त्यावर पत्र्याचे कंपाऊंड आणून नगरपालिकेचा अर्धा अधिक रस्ता अडवून अपघातांना निमंत्रण देत आहेत. पत्रा कंपाऊंडसमोर ३ फुटावर दगड लावून अर्धा वाहतुकीचा रस्ता मक्तेदाराच्या कामगारांनी अडविलेला आहे. त्यामुळे त्याठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. हे नियमाला धरुन आहे काय? या सर्व वस्तुस्थितीचा विचार करून ठेकेदारावर कडक कारवाई करावी व वाहतुकीचा रस्ता मोकळा करावा. अन्यथा सबनीसवाडा,खासकिलवाड्यातील सर्व नागरीकांना घेऊन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी यावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.