निबंध - प्रश्नमंजूषा स्पर्धा पारितोषिक वितरण

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 06, 2025 11:05 AM
views 170  views

देवगड  :  स्व.बापूसाहेब गोगटे यांनी जामसंडे येथे शाळा होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आज जामसंडे येथे भव्यदिव्य  शैक्षणिक संकुल निर्माण झाले आहे. त्याचा फायदा आजूबाजूच्या लोकांना होत असल्याचे मत देवगड येथील प्रतिथयश व्यापारी पद्माकर जोशी यांनी व्यक्त केले. स्व.बापूसाहेब गोगटे पुण्यतिथी व राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

याप्रसंगी विचारमंचावर संस्थेचे सचिव प्रवीण जोग, प्रकाश गोगटे, नम्रता तावडे, संतोष किंजवडेकर व मुख्याध्यापक सुनील जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना श्री.पद्माकर गोगटे पुढे म्हणाले की बापूसाहेबांनी जामसंडे परिसरातील गोरगरीब लोकांसाठी समाजसेवेचे व्रत अंगीकारले. राजकारण ,समाजकारण,अर्थकारण,व शिक्षणकारण या क्षेत्रातील बापूसाहेबांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रकाश गोगटे यांनी समयोचित मार्गदर्शन केले. विज्ञान दिनाचे औचित्य साधून प्रशालेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथींच्या शुभ हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

विज्ञान दिनानिमित्त कुमारी -प्रियंका माळी हिने मनोगत व्यक्त केले. विज्ञान दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

प्रशालेचा विद्यार्थी निश्चय तेली याने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मुळपिंड प्रवाळांमध्ये बायोफ्लूरोसन्स हा दुर्मीळ गुणधर्म असल्याचे संशोधन केल्याने प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी त्याला रोख रक्कम एक हजार रुपयांचे पारितोषिक मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील जाधव, सूत्रसंचालन सतीश करले व आभार संजय पांचाळ यांनी केले.