गारपीटमुळे शेतीची हानी ; सरसकट नुकसान भरपाई मागणी

Edited by: दिपेश परब
Published on: February 25, 2025 19:32 PM
views 194  views

दोडामार्ग : तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात येथील शेतकऱ्यांच्या काजू व आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने भरपाई देण्याची मागणी काजू व आंबा बागायतदार शेतकरी करत आहे. 

दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी काजू व आंबा पीक घेतात. पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यंदा वातावरणातील बदलामुळे  या पिकांवर परिणाम जाणवला. हे संकट गडद असतानाच या शेतकऱ्यांना आणखी एका अस्मानी संकटाचा सामना करावा लागला. मात्र या संकटामुळे काजू व आंबा बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी काही भागात गारपीटही झाली. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे केळी बागायती अक्षरशः उध्वस्त झाल्या. या खेरीज काजू व आंबा पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करावेत व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

केरमध्ये गारपीटमुळे शेतीची हानी, सरसकट नुकसान भरपाई द्या

केर येथे गारपीट झाली त्यामुळे काजू आणि इतर पिकाचे नुकसान झाले. काजूचा मोहर गळून पडला. काजू बागायतीवर येथील ग्रामस्थांचा उदरनिर्वाह आहे. केवळ पंचनाने करून काहीच होणार नाही कारण झडलेल्या मोहराला काय निकष लावणार आहेत त्यामुळे काजूच्या प्रतिझाडानुसार सरसकट नुकसान भरपाई द्यावी यासाठी तातडीने निकष तयार करावेत अशी मागणी केर - भेकुर्ली येथील ग्रुप ग्रामपंचायतने केली आहे. याबाबत दोडामार्ग तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याचे सरपंच, उपसरपंच यांनी सांगितले.