
दोडामार्ग : गेले कित्तेक दिवस प्रतीक्षेत असलेल्या कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या मच्छी मार्केटची इमारत लोकांच्या सेवेत आणण्यासाठी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी आज मच्छी विक्रेते व नगरपंचायत प्रशासन यांची बैठक घेऊन चिठीद्वारे सोडत काढून मच्छी विक्रेत्यांना जागा निश्चित करून दिली. शनिवार 22 फेब्रुवारी मच्छी मार्केट इमारत खुली होणार असून नागरिकांनी तसेच बाजारपेठेत येणाऱ्या तालुका वासियांनी या मच्छी मार्केटच्या ठिकाणी येऊन सेवा घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
दोडामार्ग नगरपंचायत च्या वतीने उभारण्यात आलेल्या मच्छी मार्केट इमारतीचे लोकार्पण होऊन काही महिने लोटले होते. मात्र, तांत्रिक बाबी पूर्ण झाली नसल्याने ही इमारत मच्छी विक्रेत्यांसाठी खुले करण्यात आले नव्हते. अन्य बाबी पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती आजच्या बैठकीत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली. हे बैठक मच्छी विक्रेत्यांना सोबत घेऊन प्रशासनाच्या वतीने मच्छी मार्केट इमारतीतच पार पडली. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, महिला बालकल्याण सभापती क्रांती जाधव, बांधकाम सभापती रामचंद्र मणेरिकर, नगरसेविका ज्योती जाधव, नगरसेविका संजना म्हावळंणकर, नगरसेवक नितीन मणेरीकर तसेच मच्छी विक्रेते व नगरपंचायत प्रशासन कर्मचारी उपस्थित होत.
नगराध्यक्ष चेतन चव्हाण म्हणाले की, मच्छी मार्केटची सुसज्ज अशी इमारत आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये मच्छी विक्री करत असताना विक्रेत्यांनी या इमारतीची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. आपल्यासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. तसेच या इमारतीमध्ये नंबर टाकून मार्किंग करण्यात आलेली आहे. १६ मच्छी विक्रेत्यांची बसण्याची व्यवस्था या इमारतीमध्ये होणार आहे. मात्र, आपल्याकडे सध्या तेराच मच्छी विक्रेते कार्यरत आहेत. ही जागा वाटप करत असताना कोणाच्याही मनात दुजाभाव होऊ नये यासाठी चिठ्ठीद्वारे जागा निश्चित करण्यात येईल. त्याप्रमाणे या बैठकीत सर्वांसमक्ष चिट्ठी सोडत काढण्यात आली. प्रत्येक मच्छी विक्रेत्याने स्वहस्ते चिट्टी उचलून आपली जागा निश्चित केली. मच्छी विक्रेत्यांनी स्वतःहून काढलेल्या चिट्टीमध्ये जो नंबर आला त्या नंबरावर त्या मच्छी विक्रेत्यांची नावे टाकून सर्वांसमक्ष प्रशासनाने यादी जाहीर केली. तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे अशी आचारसंहिता घालून दिली. तसेच शनिवारपासून हे मच्छी मार्केट लोकांच्या सेवेत येणारच असल्याचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले.
बाहेर बसणाऱ्यांवर कारवाई
दोडामार्ग शहरात आतापर्यंत मच्छी मार्केटचे इमारत नव्हते म्हणून मच्छी विक्रेत्यांना रस्त्यावर उघड्यावर बसावे लागत होते. याचा त्रास शहरात येणाऱ्या नागरिकांना होत होता. त्यामुळे नगरपंचायत च्या वतीने मच्छी मार्केटची सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली आहे. शनिवारपासून ही इमारत मच्छी विक्रेत्यांसाठी खुली करण्यात येणार असून यापुढे एकही मच्छी विक्रेता किंवा अन्य कोणीही बाहेरील मच्छी विक्रेता शहरात खुल्या जागेत आढळून आल्यास त्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशा सूचना नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी प्रशासनांला दिल्या.