...तर रास्ता रोको आंदोलन ; जया सावंत यांचा इशारा

Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2025 17:00 PM
views 139  views

सावंतवाडी : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सात वर्षांपूर्वी काम करण्यात आलेल्या माडखोल देऊळवाडी - खळणेवाडी सांगेली मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या धोकादायक रस्त्याची प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकारी वर्गाने येत्या आठ दिवसात तात्काळ दखल घेऊन हा रस्ता वाहतुकीस सुरळीत न केल्यास ग्रामस्थ व महिलांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सांगेली शिवसेना शाखाप्रमुख जया सावंत यांनी दिला आहे.

वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग असून कलंबिस्त पंचक्रोशीत जाण्यासाठी हा सर्वात जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र, या रस्त्यावर सध्या अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून सहा वर्षां पूर्वी या रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करीत काम रोखले होते. मात्र, त्याकडे अधिकारी वर्गाने दुर्लक्ष करण्यात आल्यामुळेच या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाल्याचे जया सावंत यांनी सांगितले. या रस्त्याला सात वर्षे होऊनही अद्याप डांबरी करण करण्याच्या अंतिम टप्प्यातील लेयरचे काम शिल्लक असल्याबद्दल जय सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले. या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून निधी मंजूर असल्याचे सांगतात. परंतु, कोणतीही कार्यवाही केली जात नाही. याबाबत जया सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.