
चिपळूण : विद्यार्थ्यांनी करियर निवडताना स्वतःची आवड, क्षमता आणि संधी यांचा विचार करून मेहनत घेणं अतिशय आवश्यक गोष्ट आहे. नुसतं आपण स्मार्ट असून चालणार नाही, तर आपल्या करियरची निवड स्मार्टपणे करून त्यात यशस्वी होणे अतिशय गरजेचे आहे. रोजगाराचा शोध घेण्यापेक्षा, स्वतः रोजगाराची निर्मिती करा व स्वयंसिद्ध बना कारण ही काळाची गरज आहे, असा संदेश रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी(डाएट) इथे हिंदी आणि सायकॉलॉजी विषयाचे प्राध्यापक मिलिंद कडवईकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचलित, मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलोरे, १० वी च्या १८ फेब्रुवारी २०२५ रोजी करमणूक केंद्र, अलोरे येथे झालेल्या शुभेच्छा समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्रा. कडवईकर पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये संगणक कौशल्य, संवाद कौशल्य, तंत्रज्ञान कौशल्य यांचा विकास होणे आवश्यक असून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये व व्यक्तिमत्व विकासामध्ये याचा लाभ होतो. अर्थातच या काळात पालकांची भूमिका ही आपल्या पाल्याशी मार्गदर्शकाची तसेच मित्रत्वाची असणे आवश्यक आहे. आवडीनुसार करियर निवडल्यास कामाची कार्यक्षमता वाढेल व समाधान टाकेल. मोबाईल हे साधन आहे साध्य नाही. त्यामुळे मोबाईलचा वापर काळजीपूर्वक, कमीत कमी व अत्यंत आवश्यक गोष्टींसाठीच केला गेला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी दक्ष रहावे. ज्ञान मिळवत असताना ते कोणाकडून मिळतं यापेक्षा मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो यावर आपली यशस्वीता ठरते. शिक्षक, पालक, समुपदेशक हे केवळ दिशादर्शक आहेत. परंतु अंतिम निर्णय आपली आवड, क्षमता याचा विचार करूनच विद्यार्थ्यांनी घ्यावा. पालकांनी आपल्या पाल्यावर कसे संस्कार करावेत यावर त्यांनी बोधकथा सांगितली. देशभक्ती, देशप्रेम, आईवडिलांप्रती आदर, गुरुजनांना आदर ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजणे आवश्यक आहेत. प्रा मिलिंद कडवईकर यांनी कौशल्य विकसनावर जास्त भर देऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले.
यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वाचासिद्ध, पर्यवेक्षिका श्रीम. गमरे , शिक्षक श्री. पाटील आणि कार्यक्रमासाठी उपस्थित पालकांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. वाचासिद्ध, पर्यवेक्षिका श्रीम. गमरे, प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व शाळासंस्था समन्वयक अरूण माने , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. जाक्कर, प्रास्ताविक सौ. मालेकर यांनी केले. सौ. खोत यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.