महावितरणच्या सेवा जोडणी शुल्क वाढीला 'क्रेडाई'चा आक्षेप

Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2025 16:00 PM
views 156  views

सावंतवाडी : महावितरण कंपनीच्या सेवा जोडणी शुल्क वाढीला 'क्रेडाई' या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने आक्षेप घेतला आहे अशी माहिती 'क्रेडाई' सावंतवाडीचे अध्यक्ष नीरज देसाई यांनी दिली. अवाजवी वाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे सचिवांकडे केल्याच त्यांनी सांगितले.

देसाई म्हणाले, विद्यमान शुल्क (०.५ ते ७.५ kW) : १,८४० प्रति जोडणी (ओव्हरहेड) असून प्रस्तावित शुल्क ३,८०० प्रति जोडणी आहे. ही अनावश्यक आणि अन्याय्य वाढ आमच्या दृष्टीने स्वीकारार्ह नाही. प्रस्तावित वाढ ही १०० टक्केपेक्षा जास्त असून अवाजवी आहे आणि ग्राहकांवर मोठा आर्थिक बोजा टाकते. ही वाढ महागाई दर आणि अनुचित खर्च वाढीच्या प्रमाणात नाही. त्यामुळे ती अन्यायकारक आहे. खर्चाचा स्पष्ट व पारदर्शक तपशील नाही. महावितरणने मोठ्या वाढीमागील तपशीलवार खर्चाचा अहवाल सादर करावा, पायाभूत सुविधा, साहित्य आणि मजुरीच्या किंमतीत यथोचित प्रमाणात वाढ झालेली नाही, तरीही शुल्क दुप्पट केले जात आहे. कोणतीही कारणमीमांसा नसताना ग्राहकांकडून अवाजवी शुल्क वसूल करणे योग्य नाही. सेवा जोडणी शुल्क वाढल्यामुळे गृहनिर्माण खर्च वाढेल.

विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील ग्राहकांना फटका बसेल. वाढलेला खर्च विकसकांना ग्राहकांवर टाकावा लागेल, ज्यामुळे घरांच्या किमती वाढतील. आर्थिक संकटात असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्रावर या वाढीमुळे अधिक आर्थिक ताण येईल. वीज कायदा २००३ नुसार शुल्क वाजवी, पारदर्शक आणि न्याय्य असणे आवश्यक आहे. ही अचानक वाढ 'परवडण्याजोगी नाही. नियामक संस्थांनी ग्राहकांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही. अचानक शुल्क वाढवण्याऐवजी, टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा विचार करावा, स्वतंत्र आणि सखोल खर्च तपासणी केल्यानंतरच कोणतीही वाढ मान्य करावी. बहुसंख्य जोडण्यांसाठी वेगळे सेवा जोडणी शुल्क प्रस्तावित करावे, जे ग्राहकांना परवडेल. त्यामुळे ही अवाजवी वाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे सचिवांकडे केल्याची माहिती क्रेडाई सावंतवाडी अध्यक्ष नीरज मोहन देसाई यांनी दिली.