उमेद अंतर्गत मुलांची बाल सभा स्थापन

Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2025 15:41 PM
views 192  views

सावंतवाडी : मळगाव कुंभार्ली येथे महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत तळवडे प्रभाग संघामधील जीवन ग्रामसंघ व मळगाव ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने कुंभार्ली येथे वय वर्ष 6 ते 18 वयोगटातील मुलांची बाल सभा स्थापन करण्यात आली. मुलांना असणाऱ्या समस्या, आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा, मार्गदर्शन याविषयीच्या मागण्या ग्रामपंचायत स्तरावर मांडण्यासाठी मुलांना हक्काचे व्यासपीठ या बालसभेच्या निमित्ताने मिळणार आहे.

तसेच मुलांना ग्रामपंचायत, प्रभागसंघ, समूह यांची रचना प्रात्यक्षिकांसह समजून घेता येणार आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवबालसभा स्थापन करण्यात आली. या बालसभेचे अध्यक्ष आयुष गुडेकर,उपाध्यक्ष सिद्धाई वेटे, सचिव मैथिली शिरोडकर आणि, सहसचिव वेदांत गोसावी, कोषाध्यक्ष रेशमा शिरोडकर यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी मळगाव ग्रामपंचायत सदस्य अनुजा खडपकर तसेच या उपक्रमासाठी लाभलेले केरळ येथील मेंटोर गिरिजा संतोष, प्रभाग समन्वयक सचिन नाईक, प्रभागसंघ व्यवस्थापक रूपाली गुडेकर, प्रभागसंघ सचिव रंजना तेली, ग्रामसंघ पदाधिकारी सचिव ममता नेरुळकर, कोषाध्यक्ष सिद्धी तेंडुलकर तसेच डीआरपी श्रावणी वेटे, बीआरपी प्राची राऊळ, सीआरपी रागिनी शिरोडकर व एलआरपी निकिता बुगडे उपस्थित होते. तसेच उमेद मधील इतर महिला सदस्य उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी गिरिजा संतोष यांनी मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत शिवबालसभेची स्थापना करण्यात आली.