
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग ने काल छेडलेल्या ठिय्या आंदोलनानंतर आज सायंकाळी उशिरा जिल्हयातील शिक्षकांचे पगार खात्यावर जमा झाले आहेत.
देवगड प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. श्रीरंग काळे यांच्या हलगर्जीपणामुळे गेले १७ दिवस जिल्हयातील शिक्षकांचे पगार रखडले होते.शिक्षक समितीने यावर आक्रमक भूमिका घेऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करीत रात्री 8 वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी यांना दालनात रोखून धरून पगार त्वरित करण्यात यावेत व काळे यांचेवर कारवाई प्रस्तावित करावी अशी मागणी लावून धरली होती.त्यानंतर प्रोसेस नुसार आणखी ४ ते ५ दिवसानंतर होणारे पगार प्रशासनाने धावपळ करून आजच जमा केले आहेत.
आता देवगड गटशिक्षणाधिकारी यांच्यावरील कारवाईवर शिक्षक समिती ठाम असून कारवाई न झाल्यास पुन्हा आकस्मिक आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस व जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी दिला आहे.