'सैनिक भवना'चे उद्घाटन

Edited by: विनायक गांवस
Published on: January 29, 2025 14:28 PM
views 172  views

सावंतवाडी : प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून शिरशिंगे गावात नव्याने उभारण्यात आलेल्या 'सैनिक भवना'चे उद्घाटन माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

शिरशिंगे गाव हा सैनिकांचा गाव म्हणून ओळखला जातो. या गावात चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वतरांगा असल्याने या गावात आल्यावर जम्मू-काश्मीरमध्ये आल्याची प्रचिती येते, हे गाव मिनी काश्मीर आहे अशा शब्दात  दीपक केसरकर यांनी शिरशिंगे गावाची स्तुती केली. या भागात आगामी काळात पर्यटनच्या माध्यमातून विविध रोजगार उपलब्ध करून देणार व गेली अनेक वर्षे रखडलेले शिरशिंगे धरणाबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अर्धवट राहिलेले धरण लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले.

शिरशिंगे धरण झाल्यास या पंचक्रोशीतील गावे सुजलाम सुफलाम होतील व येथे मोठ्या प्रमाणात हरित क्रांती घडून येईल, हे धरण होण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान माजी सैनिकांचा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष संजू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, गावचे सरपंच दीपक राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य पंढरी राऊळ,माजी सैनिक संघटना अध्यक्ष नारायण राऊळ,उपाध्यक्ष मनाजी घावरे, सचिव दीपक शिर्के, खजिनदार यशवंत राऊळ, सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे, आदी माजी सैनिक गावातील प्रमुख मानकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.