वेंगुर्ले : वेंगुर्ले सागररत्न मत्स्य बाजारपेठ येथे कोल्ड स्टोरेज सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी व मच्छी विक्रेत्या महिलांच्या इतर समस्या सोडवाव्यात अशी मागणी माजी नगराध्यक्ष सुनील डूबळे यांनी मुख्याधिकारी परिपोष कंकाळ यांची भेट घेऊन केली.
मच्छीमार्केट येथे कोल्ड स्टोरेज सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने मच्छीविक्रेत्या महिलांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मच्छीविक्रेत्या महिलांना विद्युत पुरवठा सुरळीत करावा, येथे रेलिंग नसल्याने वृद्ध ,ग्राहक यांना अपघात होऊन खाली पडण्याची शक्यता आहे, येथे स्लोप असलेल्या ठिकाणी फिक्स रेलिंग करावे , मत्स्यविक्रेत्या महिला येथे मत्स्य विक्रीसाठी पहाटे येतात, परंतु येथील मार्केटच्या बाहेरील भागात लाईटची व्यवस्था नसल्याने येथे लाईटची व्यवस्था करण्यात यावी.या मच्छी मार्केटमध्ये वरच्या मजल्यावर मटण विक्रेते बसतात, तरी त्यांची खालील भागात व्यवस्था करून देण्यात यावी. येथील बाजारपेठेत सुकवलेले मासे विक्रेत्या मागील बाजूस बसतात, परंतु ते कोणाच्या निदर्शनासही येत नाही, त्यांना मुख्य बाजारपेठेत जागा उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्या सुनील डूबळे यांनी केल्या.
दरम्यान यावेळी मुख्याधिकारी यांनी सर्व सूचना मान्य करून त्वरित समोरील बाजूस हॅलोजन लावून लाईट व्यवस्था करण्यात यावी , समोरील भागात फिक्स रेलिंग करण्यात यावे आदी सूचना संबंधित प्रतिनिधींना दिल्या. कोल्ड स्टोरेज विषयी चर्चा झाल्यानंतर ही सुविधा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी डूबळे यांना दिले.तसेच मटन विक्रेते व सुके मासे विक्रेत्या यांच्याबाबतीतही विचार करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.