
दोडामार्ग : कुडासे येथील वानोशी- दसई ते भरपाल या रस्त्याचा भूमीअभिलेख नकाशात उल्लेख नाही. तसेच हा रस्ता शासकीय जागेत असल्याचा एकही पुरावा प्रशासन सादर करु शकले नाही. मात्र पोलिसांचा धाक दाखवून आपल्या खाजगी जमिनीत डांबरीकरणाद्वारे बेकायदेशीर रस्ता केल्याचा आरोप करत भरपाल येथील जमिन मालक सत्यवान बचाराम देसाई यांनी आपल्या कुटुंबासमवेत घरासमोरच बेमुदत उपोषणाला आज सुरुवात केली. दरम्यान याच रस्त्याच्या मागणीवरुन वानोशीवाडीतील ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी उपोषण छेडले होते.
श्री. देसाई यांनी सांगितले की, वानोशी ते दसई भरपाल पर्यंतचा रस्ता नदिपात्रातून होता. परंतु या मुळ रस्त्याला बगल देऊन आमच्या खासगी जमिनीतून बेकायदेशीरपणे कच्चा रस्ता काढण्यात आला. हे प्रकरण उपायुक्त कोंकण विभाग यांच्याकडे प्रलंबित आहे. या रस्त्याचा भूमी अभिलेख नकाशात उल्लेख नाही. आमच्या खाजगी मालकीच्या जमिनीतून पोलिसांचा धाक दाखवत संबधित विभागाने डांबरीकरणाद्वारे रस्ता बनविण्याचे काम चालू केले आहे. त्यासंदर्भात आपण व आपले कुटुंबीय उपोषण करत आहोत असेही श्री. देसाई यांनी सांगितले.
याच रस्त्याच्या मागणीवरून काही दिवसांपूर्वी वानोशी मधील ग्रामस्थांनी उपोषण छेडले होते. तर हा रस्ता आपल्या जमिनीतून होत असल्याची तक्रार करत सत्यवान देसाई यांनी उपोषण छेडले आहे. ते पाहता सार्वजनिक बांधकाम विभाग आता कोणती भूमिका घेतो? त्याकडे कुडासे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.