शिक्षक समितीची शिष्यवृत्ती सराव परीक्षा विद्यार्थ्यांना दीपस्तंभासारखी

: प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: January 16, 2025 16:13 PM
views 132  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गने आयोजित केलेली शिष्यवृत्ती सराव परीक्षा ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी असून ही परीक्षा दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.गणपती कमळकर यांनी माडखोल येथे सराव परीक्षा जिल्हास्तर उदघाटन कार्यक्रमात बोलताना केले.

शिक्षक समितीच्या वतीने जिल्हा परिषद शाळांतील विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती  मोफत सराव परीक्षेचे आयोजन जिल्हास्तरावर करण्यात आले होते. त्याचा जिल्हास्तर उदघाटन कार्यक्रम गुरुवारी माडखोल नं.१ प्रशालेत पार पडला. यावेळी उदघाटक म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.कमळकर, उपशिक्षणाधिकारी धनंजय मेंगाणे,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस, प्रमुख अतिथी म्हणून राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर, सावंतवाडी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर, सचिन मदने, पतपेढी संचालक नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर,तालुकाध्यक्ष समीर जाधव, केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर, मुख्याध्यापक रश्मी सावंत, सतीश राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी केले. सराव परीक्षा उपक्रमाविषयी गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके व राज्यसरचिटणीस कोरगावकर यांनी गौरवोद्गार काढले. सतीश राऊळ यांनी सूत्रसंचालन केले तर आभार तुषार आरोसकर यांनी मानले.