सिंधुदुर्गनगरी : सन २०२३- २४ मधील पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा नुकसान भरपाई येत्या २५ जानेवारी पर्यंत न मिळाल्यास २६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील तळकट, कोणाळ, आरोस बुद्रुक, भडगाव, निरवडे, सावंतवाडी व श्रावण या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सन २०२३- २४ मधील पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी वेळोवेळी विमा कंपनीशी पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विमा रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे. मागील वर्षीची विमा रक्कम न मिळाल्याने सन २०२४- २५ या चालू वर्षीच्या विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे या मंडळातील शेतकरी चालू वर्षी विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहणार आहेत. मागील वर्षीची नुकसान भरपाई योग्य वेळेत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे यावर्षीच्या विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला नाही. तरी सन २०२३- २४ मधील हवामान आधारित फळ पिक विमा नुकसान भरपाई २५ जानेवारी पूर्वी देण्यात यावी.
अन्यथा २६ जानेवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन आज शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक तसेच निवासी उप जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे सादर केले आहे. यावेळी जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष शामसुंदर राय, आग्नेल फर्नांडिस, महेश चव्हाण, प्रकाश वारंग, अर्जुन नाईक, अमोल सावंत, संदीप देसाई, प्रणव नाडकर्णी, संतोष नागवेकर, सचिन मुळीक, आदी शेतकरी उपस्थित होते.