प्रेरणा साहित्य संमेलन रसिकांना भावलं

Edited by: विनायक गांवस
Published on: January 09, 2025 16:41 PM
views 137  views

सावंतवाडी : शिरोडा येथे प्रेरणा साहित्य संमेलन दरवर्षी २५ डिसेंबर रोजी खटखटे ग्रंथालयात आयोजित करण्याचा निर्णय नुकत्याच संपन्न झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याने शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने शिरोडा येथे आयोजित केलेल्या प्रेरणा साहित्य संमेलनाची श्रमपरिहार तथा आढावा बैठक नुकतीच खटखटे ग्रंथालयात संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. संमेलन अत्यंत नियोजनबद्ध झाल्याचे मत यावेळी उपस्थित सर्वांनी व्यक्त केले.

संमेलनाच्या अध्यक्ष प्रा.सौ.पौर्णिमा केरकर यांचे भाषण आणि त्यांचा साधेपणा खूप भावल्याचे सर्वांनी सांगितले. संमेलनातील परिसंवाद, कविसंमेलन, कै.जयवंत दळवीमधील आतल्या माणसाचे दर्शन घडवणारा कार्यक्रम, कथावाचन,पुस्तक प्रकाशन हे सगळे कार्यक्रम नियोजित वेळेप्रमाणे झाल्याने संमेलन कुठेही कंटाळवाणे झाले नाही. आयोजक भरजरी कपडे घालून न मिरवल्यामुळे संमेलन सर्वांना आपलेच वाटले,असे मतही बहुतेक सर्वांनी व्यक्त केले. संमेलनाचे समन्वयक विनय सौदागर यानी हे संमेलन खूप कमी खर्चात झाल्याचे व सगळा खर्च खटखटे ग्रंथालय, रघुवीर तथा भाई मंत्री, साहित्य संगम, मांद्रे (गोवा),राजन शिरोडकर,सोमा गावडे व आत्माराम बागलकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे प्रत्यक्ष खर्च शून्य आल्याचे सांगितले.

आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या सलग पन्नासाव्या मासिक कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजित केलेले हे संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे सौदागर यांनी ऋण व्यक्त केले. प्रेरणा साहित्य संमेलनात पारित केलेल्या कै. जयवंत दळवी यांच्या स्मारकासंदर्भातील ठरावाचा पाठपुरावा करण्याचेही या बैठकीत ठरले. बैठकीस रघुवीर तथा भाई मंत्री, गजानन मांद्रेकर, सचिन दळवी, अनिल निखार्गे, सचिन गावडे, गिरिधर राजाध्यक्ष, सोमा गावडे, सरोज रेडकर, प्रकाश मिशाळ, अविनाश जोशी, एकनाथ शेटकर, स्नेहा नारिंगणेकर,शेखर पणशीकर, वैभवी राय शिरोडकर,शुभा कुलकर्णी, अँथोनी आल्मेडा, राजन शिरोडकर, दिलीप पांढरे, जनार्दन पडवळ, अर्चना लोखंडे, प्राची पालयेकर हे साहित्य प्रेरणा कट्ट्याचे व खटखटे ग्रंथालयाचे सदस्य उपस्थित होते.