सिंधुदुर्ग : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांर्तगत बांधकाम कामगारांना नोंदणी, नूतनीकरण व लाभ अर्ज मंडळ साईट वर जाऊन बाहेरुन ऑनलाईन करण्याची पध्दत खुली करण्यात येईल व प्रलंबित ऑनलाईन लाभ अर्ज मंजूर करण्यात येतील असे आश्वासन कामगारमंत्री श्री आकाश फुंडकर यांनी भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश पदाधिकारी यांना दिल्याची माहिती बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरीभाऊ चव्हाण यांनी दिली.
महाराष्ट्र भरातील कामगारांच्या समस्यांबाबत शासनाने धोरण निश्चित करुन कामगारांना न्याय द्यावा व बांधकाम कामगारांची ऑनलाईन साईट बंद केल्यामुळे होणारा त्रास व प्रलंबित प्रश्न यासाठी भारतीय मजदूर संघाच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री श्री आकाश फुंडकर यांनी दिनांक ०७ जानेवारी २०२५ रोजी मंत्रालय मुंबई येथील आपल्या दालनात भारतीय मजदूर संघाच्या प्रदेश पदाधिकारी यांच्या सोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी भारतीय मजदूर संघ क्षेत्रीय संघटनमंत्री सी. व्ही. राजेश, प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे, महामंत्री किरण मिलगीर, संघटनमंत्री बाळासाहेब भूजबळ, प्रदेश सचिव विशाल मोहीते, कोषाध्यक्ष बाळासाहेब कांबळे, बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरीभाऊ चव्हाण, असंघटित क्षेत्र सहप्रभारी श्रीपाद कुटासकर, विज कन्ट्राटी कामगार संघ सरचिटणीस सचिन मेंगाळे, घरेलु कामगार संघ प्रदेश अध्यक्षा मिनाक्षी पाटील, जनरल सेक्रेटरी संजना वाडकर, सागर पवार व विदर्भ प्रांत पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र भरातील कामगारांच्या समस्यांबाबत चर्चा करताना महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगारांना बाहेरुन ऑनलाईन करण्याची पध्दत पूर्णतः बंद केल्यामुळे शासनाच्या सेवा सुविधा केंद्रात मक्तेदारी वाढली होती. नोंदणी, नूतनीकरण व लाभ अर्ज ऑनलाईन करण्यासाठी कामगारांना रोजगार बुडवून दिवसभर शासनाच्या सेवा सुविधा केंद्रात तात्कळत उभे राहावे लागत आहे. लाईट नसणे, नेट नसणे, साईट एरर व अननुभवी कर्मचारी यांच्यामुळे बांधकाम कामगारांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब भारतीय मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार मंत्री महोदय आकाश फुंडकर यांच्या निदर्शनास आणून दिली असता, बांधकाम मंडळाची बाहेरुन ऑनलाईन करण्यासाठीची साईट खुली करण्यात येईल असे सांगीतले. त्याच प्रमाणे बांधकाम कामगारांचे प्रलंबित २ लाखापेक्षा जास्त ऑनलाईन लाभ अर्ज मंजूर करुन लाभ रक्कम कामगारांच्या बॅंक खाती जमा करण्यात येईल. बांधकाम कामगारांना ठेकेदार एजन्सीं मार्फत चालू असलेल्या योजनांचा फेर आढावा घेऊन कामगार कुटुंबीयांच्या कल्याणासाठी त्यात सुधारणा करण्यात येईल. बोगस नोंदणी व ऐजंटांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच घरेलु कामगारांच्या कल्याणासाठी निधीची तरतूद करुन कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, घरेलु कामगारांना संसार उपयोगी भांडीसंच वाटप करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र भरातील कामगारांच्या समस्यांबाबत यापूढेही भारतीय मजदूर संघ प्रदेश पदाधिकारी यांच्या सोबत बैठका आयोजित करुन कामगारांना न्याय देण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात येईल असेही कामगार मंत्री महोदय आकाश फुंडकर यांनी सांगीतल्याची माहिती श्री हरीभाऊ चव्हाण यांनी दिली.