
सावंतवाडी : आंबोली परिसरात जिल्ह्यातील अन्य ठिकाणी पकडलेले वन्य प्राणी सोडू नये अशी मागणी आंबोली ग्रामपंचायतीच्या वतीने वन विभागाचे उप वनसंरक्षक श्री. रेड्डी यांच्याकडे करण्यात आली आहे. ग्रामस्थांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून या पुढे वन्य प्राणी आंबोली परिसरात सोडण्यास मनाई करण्यास तातडीने आदेश देण्याची विनंती त्यांनी केली.
याबाबतचे निवेदन वनविभागाचे उप वनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. आंबोली परिसरात जिल्ह्यातील अन्य ठिकाणी पकडलेले वन्य, जीव, प्राणी सोडु नयेत अशी विनंती यावेळी करण्यात आली. याप्रसंगी आंबोली प्रमुख गावकर शशिकांत गावडे, आंबोली भाजपा प्रमुख रामचंद्र गावडे,
आंबोली विकास सोसायटी उपाध्यक्ष महादेव गावडे,
आंबोली बूथ अध्यक्ष तुकाराम पाटील, आंबोली भाजपा कार्यकर्ते संतोष पालेकर,आंबोली शिवसेना कार्यकर्ते विशाल बांदेकर, विजय राऊत आदी उपस्थित होते.
आंबोली वनपरीक्षेत्रमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा व कोल्हापूर जिल्ह्यात पकडलेले वन्य प्राणी मुख्यत्वे माकड, बिबटा इत्यादी वन विभागामार्फत सोडण्यात येतात. आंबोली परिसरातील जनता गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या कबूलयतदार गावकर जमीन प्रश्नामुळे फार मोठा प्रमाणात त्रस्त आहे. आंबोली परिसरातील येथील जनतेला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई भेटत नाही. मग, ती वन्य प्राण्यांमुळे अथवा अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आप्पत्ती. त्यात आंबोली परिसरातून बेळगाव व कोल्हापूर या दोन्ही शहरांना जोडणारा रस्ता जातो. वाहतूक मोठया प्रमाणात असते. बऱ्याच वेळा वन्य प्राणी मुख्य रस्त्यावर येऊन अपघात घडत असतात व त्यात वन्य प्राणी व मनुष्य हानी ही मोठ्या प्रमाणात होत असते.
तसेच आंबोली परिसरात मानवी वस्तीत वन्य प्राणी येत असल्यामुळे आंबोली परिसरात नेहमीच वन विभाग, वन्य प्राणी व मनुष्य यांच्यात संघर्ष होत असतो. वन विभाग आंबोली परिसरात जिल्ह्यातील इतर ठिकाणी पकडलेले वन्य प्राणी सोडत असल्याचे समजते.आंबोली परिसरातील ग्रामस्थांवर बऱ्याच वेळेस वन्य प्राण्यांकडून हल्ले देखील झाले आहेत. आंबोली परिसरातील पिढ्यान पिढ्या राहणारे ग्रामस्थ वन्य प्राण्याच्या त्रासामुळे शेती व्यावसाय सोडत चालले आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी पकडलेले वन्य प्राणी हे आंबोली परिसरात न सोडता त्यांना अभयाराण्यात सोडावे अशी मागणी केली आहे.