
सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा हायस्कूल आरोंदा व कला वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालयात आरोंदा पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप नाईक व बाबुराव जाधव यांनी शालेय विद्यार्थ्यांना 'हत्यारे व त्यांचा वापर आणि सुरक्षितता' याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष हाताळणी कशी करतात? याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांनी विद्यार्थ्यांना 'पोलीस व संरक्षण दल यातील सेवेचे महत्त्व व राष्ट्राच्या प्रति कर्तव्य भावना पार पाडण्याची संधी' याविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांना या माध्यमातून देशाच्या व राज्याच्या संरक्षण आणि सुरक्षा दलामध्ये जाण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम या माध्यमातून झाले. 'पोलीस सप्ताहा'च्या निमित्ताने यावेळी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक -प्राचार्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अशा प्रकारची वेळोवेळी शालेय विद्यार्थ्यांना माहिती देऊन सामाजिक सुरक्षिततेसंबंधीची काळजी घेण्यासाठी परस्पर सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक प्राचार्य सिद्धार्थ गोपाळ तांबे, सहाय्यक शिक्षक चंदन गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप नाईक व बाबुराव जाधव व अन्य उपस्थित होते.